शेवगाव (प्रतिनिधी): करोना महामारी रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या काळात अनेक ज्ञात-अज्ञातांनी आपापल्या परीने समाज बांधवांना मदत करण्याचे कार्य केले आहे. असेच कार्य एच आय व्ही सारख्या दूर्धर आजाराने त्रस्त असणा-या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिव्हिंग विथ एच आय व्ही (एन एम पी ) या संस्थेअंतर्गत राबविण्यात आले.
विहान प्रकल्पाच्या क्षेत्रीय कार्यकर्त्या संगीता दराडे यांनी एच आय व्ही बाधितांसाठी केलेले कार्य अत्यंत प्रशंसनीय आहे. या काळात त्यांनी घरादाराची व स्वतःची काळजी न करता या सेवाभावी कार्यात स्वतःला अहोरात्र झोकून देऊन काम केल्याबद्दल त्यांना सॅलूट करायला हवा, असे हे कार्य आहे.
शेवगाव परिसरात असलेल्या अनेक एचआयव्ही बाधितांना त्यांच्या स्टेजनुसार नगर, पुणे व मुंबईहून संस्थेद्वारे औषध उपलब्ध केले जाते. हे औषध घेतांना खंड पडून चालत नाही. क्षेत्रिय कार्यकर्त्या दराडे यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत हे औषध सर्व संबंधीताना वेळेत घरपोच दिले आहे.
एचआयव्ही रुग्णांना अॅन्टी रेट्रोव्हायरल थेरपी हे औषध दर महिन्याला न चूकता घ्यावे लागते. वाहनांची सोय नसतांनाही संगीता दराडे यांनी या रूग्ण सेवेत खंड पडू न देता औषध घरपोहोच केली. या काळात या रुग्णांसाठी दराडे देवदूत ठरत्या आहेत. यावेळी त्यांना परिसरातील ग्रामीण रुग्णालयाची मदत झाली.
रुग्णांच्या जवळील कोणत्या आरोग्य केंद्रांमध्ये हे औषध मिळू शकेल याचीही माहिती त्यांनी रुग्णांना दिली. तसेच वेळोवेळी त्यांनी मोबाईलवर संपर्क साधून रुग्णांच्या अडीअडचणी जाणून घेऊन औषध मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे, दराडे यांना प्रकल्प संचालक प्रशांत येंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.