चेन्नई – तटरक्षक दलाच्या पूर्वेकडच्या प्रदेशातील 840 स्क्वाड्रनमध्ये वजनाने हलक्या असलेल्या अत्याधुनिक एमके-3 हेलिकॉप्टरच्या तुकडीचा समावेश करण्यात आला आहे. चेन्नई येथील तटरक्षक दलाच्या हवाई तळावर तटरक्षक दलाचे महासंचालक व्ही एस पठानिया यांच्या हस्ते बुधवारी एका समारंभात ही हेलिकॉप्टर तटरक्षक दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली.
यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या अतिशय संवेदनशील सागरी क्षेत्रात भारतीय तटरक्षक दलाच्या क्षमतेला आणखी बळकटी मिळाली आहे.
एएलएच एमके-3 या हेलिकॉप्टरचे उत्पादन संपूर्णपणे देशी बनावटीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून करण्यात आले असून त्यामध्ये अत्याधुनिक रडार प्रणाली आणि इलेक्ट्रो ऑप्टिक सेन्सर्ससह अत्याधुनिक सामग्री, शक्ती इंजिन्स, पूर्णपणे काचेचे कॉकपिट, उच्च संवेदी सर्च लाईट, अत्याधुनिक संपर्क प्रणाली, स्वयंचलित ओळख प्रणाली त्याचबरोबर सर्च ऍन्ड रेस्क्यू होमर अशा प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. यामुळे दिवसा आणि रात्री अशा दोन्ही वेळी हे हेलिकॉप्टर सागरी बचाव मोहीमा त्याचबरोबर दूर अंतरापर्यंत शोध आणि बचाव कार्य करण्यात सक्षम आहे.
हेवी मशिनगनसह असलेल्या या हेलिकॉप्टरचा वापर आक्रमणांसाठीचे साधन म्हणून करण्यासोबतच वैद्यकीय अतिदक्षता उपकरणांसह गंभीर रुग्णांची ने आण करण्यासाठी देखील करता येऊ शकतो.