नगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेला वाळू तस्कर योगेश कोळपे (रा.कोळपेवाडी, ता. कोपरगाव) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थाबद्धतेची कारवाई करण्यात आली. नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्यास स्थानबद्ध करण्यात आले आहे.
योगेश कोळपे याने कोपरगावमध्ये मारहाण करणे, दरोडा, गौणखनिज उत्खनन, सरकारी नोकरावर हल्ला आदी गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी एमएपीडीए कायदयान्वये प्रस्ताव तयार करुन उप विभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग व अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांच्या मार्फत पोलीस अधीक्ष राकेश ओला यांना सादर केला होता.
पोलीस अधीक्षकांनी पडताळणी करत हा प्रस्ताव शिफारस अहवालासह जिल्हादंडाधिकारी सिद्धराम सालीमठ यांना सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करुन योगेश कोळपे यास स्थानबद्ध करण्याचे आदेश काढले. नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे योगेश कोळपे याला स्थानबध्द करण्यात आले.