अमृतसर : जर्मनीतून इटलीमार्गे परत आलेल्या 72 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा पंजाबमधील नवानशहर जिल्ह्यात रुग्णालयात मृत्यू झाला. देशातील हा चौथा बळीआहे. या वृध्दाला मधुमेह आणि रक्तदाब होता. बांगा कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, असे पोस्टग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्यूकेशन आँड रिसर्चचे संचालक जगत राम यांनी स्पष्ट केले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पंजाबमध्ये कोरोनाचा चौथा बाधित दगावल्याचे जाहीर केले. या वृद्धाचा बुधवारी मृत्यू झाला होता. हे वृध्द सात मार्च रोजी जर्मनीहून इटली मार्गे आले होते. आरोग्य तज्ज्ञांनी लोकांनी एकमेकांपासून लांब राहण्याचे आणि आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवासात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हे वृध्द छातीत दुखत असल्याने बुधवारी रुग्णालयात दाखल झाले. तेथेच कोसळले. त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. या 72 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल बुधवारी रात्री मिळाला, असे जगत राम यांनी स्पष्ट केले. राज्याचे प्रधान सचिव अनुराग अग्रवाल यांनी बांगा येथील एका रहिवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल आला असल्याचे सांगितले. दरम्यान देशातील कोरोना बाधीतांची संख्या 18 ने वाढून 169वर पोहोचली. पंजाबमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बस आणि ऑटोरिक्षा सेवा बंद करण्यात आली आहे.