26 प्रकरणात समीर वानखेडेंनी केल्या खोट्या कारवाया; एनसीबी अधिकाऱ्याचाच ‘लेटर बॉम्ब’

मुंबई  – एनसीबी मध्येच काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने आपल्याला एक निनावी पत्र पाठवले असून त्यात त्याने समीर वानखेडे हे कसे खोट्या कारवाया करतात याचा तपशील सादर केला आहे असे राज्यातील एक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले आहे. हे पत्र त्यांच्या ट्‌विटर हॅंडलवर प्रसारीत केले आहे.

या पत्रात संबंधीत एनसीबी अधिकाऱ्याने वानखेडे यांनी ज्या खोट्या कारवाया केल्या आहेत त्या 26 प्रकरणांची यादीच सादर केली आहे. समीर वानखेडे हे दिल्लीच्या सांगण्यावरून खोट्या कारवाया करतात, कारवाईची धमकी देऊन खंडणी वसुली करतात असा आरोपही मलिक यांनी या पत्राच्या आधारे केला आहे.

एनसीबीच्या या अधिकाऱ्याने या पत्रावर आपले नाव लिहीलेले नाही, पण त्याच्या पत्रात जो गंभीर तपशील सादर करण्यात आला आहे त्याची एनसीबीने दखल घेऊन चौकशी केली पाहिजे असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनीही या पत्रातील आरोपाची चौकशी केली जाईल असे स्पष्ट केले आहे त्यामुळे वानखेडे चांगलेच गोत्यात आले आहेत.

वानखेडे यांनी स्वता या पत्रातील तपशीलाचा इन्कारही केला आहे. समीर वानखेडे यांना पैशाबरोबरच प्रसिद्धीचीही मोठी हौस असून त्यांनी अनेकांना मादकद्रव्यांच्या प्रकरणात खोटे अडकवले आहे असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

या पत्राच्या प्रति महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक आणि अन्य वरीष्ठांनही पाठवण्यात आल्या आहेत. खोटी प्रकरणे बनवण्यासाठी वानखेडे यांनी एक स्वतंत्र टीमही तयार केली होती असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.


कोण आहेत वानखेडे यांचे हस्तक ?
या पत्रात वानखेडे हे कोणा हस्तकामार्फत ड्रग्ज खरेदी करीत असत त्यांचीही नावे देण्यात आली आहेत. दशरथ, जमील, मोहंमद, अफजल, नासीर अदिल उस्मानी ही माणसे वानखेडेंसाठी मादक द्रव्यांचे साठे उपलब्ध करून देत आहेत. त्याचा उपयोग खोट्या कारवायांसाठी केला जात असे. या साठी एनसीबीच्या सिक्रेट फंडातील पैसा वापरला जात असे किंवा कारवाईच्यावेळी मिळालेल्या पैशांचाहीं त्यासाठी वापर होत असे. काही प्रकरणांमध्ये छोट्या प्रमाणात मादकद्रव्ये सापडली तर त्यात आपल्याकडील साठे दाखवून या आरोपींना जामीन मिळणार नाही अशी व्यवस्थाही वानखेडे करीत होते असेही या पत्रात म्हटले आहे. वानखेडे हे आपल्याच कार्यालयात खोटे पंचनामे तयार करीत असतात आणि ते घटनास्थळी तयार केले जातात असे भासवले जाते असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.