नगर, (प्रतिनिधी) – ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजूरीला समाजवादी पक्षाच्या वतीने विरोध करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अहमदनगर या नावाला विरोध का? याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा, अन्यथा इतिहासप्रेमी आणि समाजवादीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
५३४ वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामंतर करू नये व प्रशासक असलेल्या आयुक्तांनी नामांतराचा मंजूर केलेला प्रस्ताव त्वरीत रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली. या बाबत अप्पर जिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांना देण्यात आले.
या वेळी समाजवादी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन, सलीम सहारा, आसिफ रजा, शब्बीर खान, इकराम तांबटकर, अल्ताफ लक्कडवाला, आवेज सय्यद, तन्वीर बागवान, समीर शेख, एजाज सहारा, गनी शेख, अश्पाक शेख, तन्वीर सय्यद, समीर शेख, मुबीन सय्यद, जुबेर शेख, अश्फाक शेख आदी उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा सर्वांना अभिमान व आदर असून, त्यांचे जन्मस्थान असलेले चोंडी किंवा जामखेडला त्यांचे नाव देण्यात यावे. परंतु ५३४ वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामंतर करू नये, नामांतराचा प्रस्ताव त्वरीत रद्द करण्याची मागणी समाजवादी या वेळी करण्यात आली.