मेलबर्न – एकाच षटकात सहा षटकार फटकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रमाची नोंद करणारे फलंदाज पाहिले आहेत. मात्र, एकाच षटकात तब्बल 8 षटकारांच्या मदतीने एकूण 50 धावा करणारा सॅम हॅरिसन हा ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेटचा हिरो ठरला आहे. त्याने नाथन बेनेट या गोलंदाजाच्या षटकात या जागतिक विक्रमाची नोंद केली.
हॅरिसनने सोरेंटो डनक्रेग वरिष्ठ क्लबकडून खेळताना किंग्स्ली वूडव्हेल वरिष्ठ क्लबविरुद्धच्या सामन्यात 39 व्या षटकात बेनेटच्या एकाच षटकात तब्बल 50 धावा वसूल केल्या. बेनेटने टाकलेल्या या षटकात हॅरिसनने सहा षटकार फटकावले.
बेनेटने या षटकात दोन नोबॉलही टाकले होते. त्यामुळे या षटकात त्याने एकूण 50 धावा बहाल केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन फलंदाजांनी एकाच षटकात सहा षटकार फटकावण्याची कामगिरी केली.
भारताचा युवराज सिंग, वेस्ट इंडीजचा कॅरन पोलार्ड व दक्षिण आफ्रिकेचा हर्शेल गिब्ज यांनीच ही कामगिरी केली आहे.