लाहोर – नवीन पाकिस्तानचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या इम्रान खान यांनी देशाला अधिक गरीब बनवले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी परदेशातून मिळालेल्या कोट्यवधींच्या भेटवस्तू विकून आपली संपत्ती वाढवत आहेत, असा आरोप पाकिस्तानच्या मुख्य विरोधी पक्षांनी केला आहे. यामुळे इम्रान खान यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम यांनी परदेशी भेटवस्तूंवरून इम्रान खान यांच्यावर जोरदार हल्ला केला.
पंतप्रधान इम्रान खान यांनी इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू बेकायदेशीरपणे विकल्या, ज्यात एक दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या महागड्या घड्याळाचा समावेश आहे. राष्ट्राचे प्रमुख आणि घटनात्मक पदांवर असलेले अधिकारी यांच्यात अधिकृत भेटींमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. पाकिस्तानच्या गिफ्ट डिपॉझिटरीमधील नियमांनुसार, या भेटवस्तू राष्ट्राची मालमत्ता आहेत जोपर्यंत त्यांचा उघड लिलाव होत नाही. नियमांनुसार, अधिकारी 10,000 रुपयांच्या खालच्या किमतीच्या भेटवस्तू स्वतः जवळ ठेवू शकतात.
मरियम नवाज यांनी एक ट्वीट केले आहे. एकीकडे इम्रान खान यांनी तोशाखानाच्या भेटवस्तू लुटल्या आणि तुम्ही मदिना सारखे राज्य स्थापन करण्याची चर्चा करता? एखादी व्यक्ती इतकी असंवेदनशील, बहिरी, मूक आणि आंधळी कशी असू शकते?, असे मरियम नवाज यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंटचे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनीही इम्रान खान यांच्यावर आरोप केले आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांनी एका राजकुमाराकडून मिळालेले महागडे घड्याळ विकल्याच्या बातम्या आहेत. हे लाजीरवाणे आहे.
सोशल मीडियावर अशा बातम्या येत आहेत की इम्रान खान यांना एका आखाती देशाच्या राजपुत्राने दहा लाख अमेरिकन डॉलर्सचे घड्याळ भेट दिले होते. हे घड्याळ दुबईमध्ये इम्रान खानच्या एका जवळच्या मित्राने दहा लाख डॉलर्सला विकत घेतले आणि ते पैसे इम्रान खानला दिले. भेटवस्तूंच्या विक्रीबद्दल राजाला कळले आहे, असे मौलाना फजलूर रहमान असे म्हटले आहे.