पारगाव शिंगवे -आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथे एक 38 वर्षीय सलून व्यावसायिक करोनाबाधित रुग्ण सापडला असून गावात चिंतेचे वातावरण पसरले आहे. गावात करोना रुग्णांची संख्या 3 झाली असून दोन रुग्ण बरे झालेले आहेत.
पारगाव येथील गावठाण भागात सलून व्यवसाय करणाऱ्याचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या कुटुंबातील 10 व्यक्तींना तसेच सलून दुकानात काम करणाऱ्या 2 कारागिरांना विलगीकरण करण्यात आलेले आहे.
करोना बाधित रुग्णाच्या संपर्क आलेल्या व्यक्तींची माहिती ग्रामपंचायत प्रशासन घेत आहेत, असे ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजणे यांनी सांगितले. 1 जुलैला गावात करोना बाधित रुग्ण सापडला होता, तेव्हापासून गाव सील करण्यात आलेले आहे.
पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, बिटजमादार सागर गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे आदिंनी गावाला भेट देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, सलून व्यावसायिकाशी संपर्क आल्याने सरपंच बबनराव झोबळे यांनी आपल्या घरी स्वतः ला क्वारंटाइन करून घेतले आहे, अशी माहिती त्यांनी स्वतः दिला.