बॉलीवूडमध्ये सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या अफेअरची चर्चा विशेष रंगली होती. 2005 मध्ये मैंने प्यार क्यों किया चित्रपटातून कतरिनाने बॉलीवूडमध्ये डेब्यू केले होते. आता कतरिनाला सुमारे 15 वर्षे झाले असून ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता कतरिनापाठोपाठ तिची धाकटी बहीण इसाबेल कैफदेखील मोठी फॅन फॉलोइंग मिळवत आहे.
इसाबेलने माशा-अल्लाह या गाण्यातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. इसाबेलचे हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूडमध्ये कतरिनाला लॉंच करणाऱ्या सलमान खानने देखील इसाबेलचे हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. एवढंच नव्हे तर तिच्या गाण्याचे कौतुक करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने केलेले इसाबेलचे कौतुक बघता कतरिना प्रमाणेच सलमान इसाबेलला देखील लॉंच करेल अशी शक्यता नाकारता येणार नाही.
दरम्यान, नवीन अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये लॉंच करण्याबद्दल सांगायचे झाल्यास नव्वदच्या दशकात भाग्यश्री, नगमा, रवीना टंडन, आयेशा जुल्का, रेवती यासारख्या नामांकित अभिनेत्रींना देखील सलमाननेच लॉंच केले होते. त्यानंतर सलमाननेच लॉंच केलेल्या कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, डेझी शाह, झरीन खान या अभिनेत्री आजही बॉलीवूडवर अधिराज्य करत आहेत.