मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केलेल्या पतधोरणात व्याजदरात अर्धा टक्का वाढ केली आहे. त्याचबरोबर महागाई वाढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विकास दरही कमी पातळीवर असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेअर बाजारात विक्री कायम राहिली. परिणामी सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 214 अंकांनी कमी होऊन 54,892 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 60 अंकांनी म्हणजे 0.37 टक्क्यांनी कमी होऊन 16,356 अंकावर बंद झाला.
रशिया- युक्रेन युद्ध आणि परदेशी गुंतवणुकीचा बाहेर चाललेला प्रवाह हे गुंतवणूकदाराच्या चिंतेचे विषय आहेत. भारती एअरटेल, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स, ऍक्सिस बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक या कंपन्यांच्या शेअरची घसरण झाली.
तर टाटा स्टील, स्टेट बॅंक, डॉक्टर रेड्डीज, बजाज फायनान्स, टायटन, मारुती, टीसीएस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा स्मॉल कॅप 0.33 टक्क्यांनी कमी झाला. त्याचबरोबर मिड कॅप 0.15 टक्क्यांनी कमी झाला. दूरसंचार क्षेत्राचा निर्देशांक 1. 62 टक्क्यांनी, ग्राहक वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 0.95 टक्क्यांनी, उर्जा क्षेत्राचा निर्देशांक 0.87 टक्क्यांनी, तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राचा निर्देशांक 0.17 टक्क्यांनी कमी झाला. तर आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, वाहन क्षेत्राचे निर्देशांक थोड्या प्रमाणात वाढले. आतापर्यंत पिछाडीवर असलेल्या धातू क्षेत्राचा निर्देशांक आज काही प्रमाणात वाढला.
रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणे अपेक्षित होते. त्यामुळे निर्देशांकामध्ये जास्त घट झाली नाही. आता पुढील आठवड्यात अमेरिका आणि युरोपच्या रिझर्व्ह बॅंकांचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. विशेषत: परदेशी गुंतवणूकदार काय करतात यावर निर्देशांकाची पुढील वाटचाल अवलंबून आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काल 2,293 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असून आता या तेलाचे दर 121 डॉलरवर गेले आहेत.
विश्लेषकांनी सांगितले की, व्याजदरात वाढ करण्याबरोबरच आगामी काळामध्ये रिझर्व बॅंक मवाळ धोरण जाहीर करणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहेत. अशा अवस्थेमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे दिसून आले. यावर्षी विकासदर मापक राहणार आहे. त्याचबरोबर महागाई वाढणार असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.