मुंबई – केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क बरेच कमी केले आहे. महागाई कमी करण्यासाठी राज्यांनी पुढाकार घेऊन पेट्रोल आणि डिझेलवरील विक्री कर कमी करावा असे आवाहन रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केले आहे.
केंद्र सरकारने 21 मे रोजी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क आठ रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क सहा रुपयांनी कमी केले आहे. मात्र कोणत्याही राज्याने 21 मे नंतर पेट्रोल आणि डिझेल वरील विक्रीकर कमी केलेला नाही.
अगोदर नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क पाच रुपयांनी कमी केले होते व डिझेलवरील उत्पादन शुल्क 10 रुपयांनी कमी केले होते. त्यावेळी 25 राज्यांनी विक्री करात कपात केली होती. मात्र आता कोणत्याही राज्याने विक्री करात कपात केलेले नाही.
अजूनही पेट्रोलवरील केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क प्रति लिटरला 19 रुपये 90 पैसे आहे. तर डिझेलवरील केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क 15 रुपये 80 पैसे आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे इंधनावरील कर अजूनही जास्त आहेत असे बऱ्याच राज्यांचे म्हणणे आहे. जागतिक बाजारात तेलाचे दर कमी असताना केंद्र सरकारने उत्पादन शुल्क मोठ्या प्रमाणात वाढवून ठेवले होते. त्यामुळे केंद्र सरकारने उत्पादन शुल्क आणखी कमी करावे असे काही राज्यांचे म्हणणे आहे.