मुंबई – स्थानीक पातळीवर काही रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदणी न केलेले डिजिटल लेंडींग ऍप सक्रिय आहेत. या ऍप चालकाकडून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत. असा प्रकार घडल्यानंतर संबंधित ग्राहकांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी असा सल्ला रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिला आहे.
याचा अर्थ ज्या ऍपची रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदणी झालेली आहे, त्या ऍप चालकानी काही गैरप्रकार केल्यानंतर रिझर्व्ह बॅंक त्यांच्याविरोधात कारवाई करेल. मात्र ज्या ऍपची रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदणी झालेली नाही, त्या ऍप चालकांविरोधात रिझर्व्ह बॅंक फारशी कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदणी न केलेल्या ऍप चालक व त्यांचे एजंट बऱ्याच ग्राहकांना कर्ज देऊन त्यांच्याकडून जबरी वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ग्राहकांनी आत्महत्या केल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यातील बरेच ऍप रिझर्व्ह बॅंकेकडे नोंद झालेले नाहीत. अशा ऍपविरोधात आमच्याकडे तक्रारी येतात. आम्ही त्यांना पोलिसात जाण्याचा सल्ला देतो असे दास यांनी सांगितले.
ज्या ऍपची रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यांची यादी रिझर्व्ह बॅंकेच्या वेबसाईटवर आहे. बऱ्याच पोलिसांनी अशा बोगस ऍपविरोधात परिणामकारक कारवाई केली असल्याचे दास यांनी सांगितले.
ज्या ऍपची रिझर्व्ह बॅंकेकडे नोंदणी आहे, अशा ऍपनी जर काही गैरप्रकार केला तर त्यांच्या विरोधात रिझर्व्ह बॅंक तात्काळ कारवाई करेल असे दास यांनी स्पष्ट केले. ग्राहकांनी आपले व्यवहार काळजीपूर्वक करण्याची गरज असते. विशेषतः डिजिटल व्यवहार करताना अतिशय काळजी घेण्याची गरज असते असे दास यांनी सांगितले.