तेलगू सुपरस्टार महेश बाबूचे भारतभर लाखो चाहते आहेत. हिंदीमध्ये त्याच्या डब केलेल्या चित्रपटांनंतर उत्तर भारतातही त्याची भली मोठी फॅन फॉलोइंग आहे. महेश बाबूचा “भारत अणे नेनु’ हा चित्रपट हिंदीमध्ये “डॅशिंग सीएम भारत’ म्हणून प्रदर्शित झाला. हा चित्रपट हिंदीमध्ये खूप लोकप्रिय ठरला. यातील महेश आणि कियारा अडवाणी यांची जोडीही चांगलीच प्रसिद्ध झाली. अर्थात, पुन्हा एकदा ही जोडी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत, पण बातमी काही वेगळी येत आहे.
महेश बाबूच्या आगामी “सरकारू वारी पाता’ या चित्रपटात पुन्हा एकदा कियारा अडवाणी झळकेल असा अंदाज होता. पण या चित्रपटासाठी “दबंग 3’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सई मांजरेकर ही नायिकेची भूमिका साकारणार आहे. याबाबत निर्मात्यांनी सईशी संपर्क साधला आहे.
वास्तविक, कियाराकडे या चित्रपटासाठी तारखा नसल्याने सईला संधी मिळाली आहे. सुपरस्टार महेशचा हा 27 वा चित्रपट असेल ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, महेशसोबत यामध्ये हिरोईन कोण असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.
या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय महेशने सुपरहिट “बाहुबली’चे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच चित्रपटही साइन केलेला आहे, ज्याचे शूटिंगही लवकरच सुरू होणार आहे.