सोनाली नवांगुळ, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार

मुंबई – सोनाली नवांगुळ यांच्या “मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मूळ तमिळ भाषेतील हे पुस्तक फ्रेंचसह अन्य चार भाषांमध्ये अनुवादित झाले. मंजुषा कुलकर्णी यांना “प्रकाशवाटा’ या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठीही अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या गावातील असणाऱ्या सोनाली प्रकाश नवांगुळ वयाच्या नवव्या वर्षी पाठीवर बैलगाडी पडल्याने पॅराप्लेजिक बनल्या. त्यांनी घरातच राहून पदवीपर्यंतच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर 2000 मध्ये त्या कोल्हापुरात आल्या. हेल्पर्स ऑफ दि हॅंडिकॅप्ड या संस्थेत 2007 पर्यंत सोशल वर्कर म्हणून काम केले.

2007 साली अपंग असूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात उतरण्याचा निर्णय घेऊन त्या संस्थेतून बाहेर पडल्या. सोनाली नवांगुळ या भारतातल्या स्पर्शज्ञान’ नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या 2008 पासून उपसंपादक असून रिलायन्स दृष्टी’ या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात; मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात.

अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले स्वच्छंद’ हे पुस्तक मेनका प्रकाशना’ने प्रकाशित केले आहे.
दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणाऱ्या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद “ड्रीमरनर’ या नावाने मनोविकास’ने प्रकाशित केला आहे.

भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे याकरता मनोविकास’ प्रकाशनाची कविता महाजन यांनी संपादित केलेली जी पुस्तक मालिका आली त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी “मध्यरात्रीनंतरचे तास’ या नावाने मराठीत आणली आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोनाली यांनी 2014 मध्ये पुणे येथे झालेल्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना’चे अध्यक्षपद भूषविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.