किलीमांजारो शिखर सर केल्याबद्दल केला सत्कार
शिरूर (प्रतिनिधी) – साहिल बांदल तू एव्हरेस्टसाठी तयारी कर, काही अडचण असल्यास मला सांग, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी दिली.
शिरूर येथील 22 वर्षीय गिर्यारोहक साहिल दत्तात्रय बांदल या युवकाने आफ्रिका खंडातील सर्वोच्च किलीमांजारो हे शिखर सर करून भारताचा 115 फूट लांबीचा तिरंगा फडकवण्याचा विश्वविक्रम केला. याबद्दल शरद पवार यांनी त्याचा सत्कार केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके, महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा सुवर्णा धाडगे, पारनेर पंचायत समिती उपसभापती सुनंदा धुरपते, उद्योजक सुरेशशेठ धुरपते यांच्यासोबत साहिलने पवारांची भेट घेतली. त्यावेळी पवारांनी त्याच्याबरोबर तब्बल अर्धा तास गिर्यारोहण या विषयावर चर्चा करून पवार म्हणाले, साहिल तू एव्हरेस्टसाठी तयारीकर काही अडचण आल्यास आमदारांना सांग ते मला सांगतील, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, साहिलेने आमदार नीलेश लंके व सुवर्णा धाडगे यांच्यासोबत विधानभवनाला भेट दिली. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, औद्योगिक व वसाहत मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, आमदार सुमन पाटील, आमदार भारतनाना भालके आदींनी साहिलचे अभिनंदन व कौतुक केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पवारांनी अनुभव केले शेअर
शरद पवार यांनी आपण संरक्षणमंत्री असताना सियाचीन दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांना आलेले अनुभव त्यांनी शेअर केले. साहिलेने हिमालयातील एव्हरेस्ट शिखर सर करावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तू हिमालय सर केल्यानंतर माझ्या दुष्काळी शिरूरच्या मुलाने एवरेस्ट शिखर सर केले हे मला सर्वांना अभिमानाने सांगता येईल, असे पवार म्हणाले.