मुंबई – सचिन तेंडुलकर हे असे व्यक्तिमत्त्व आहे की त्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती भारावून जाते. त्याला पहिल्यांदा भेटणाऱ्यांच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही. मात्र, हाच सचिन एका खेळाडूसमोर निःशब्द झाला तर कसे वाटेल. मात्र, हे खरोखर घडले आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील रजतपदक विजेत्या मीराबाई चानूने बुधवारी मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली व त्याला आपले पदकही दाखवले. तेव्हा क्रिकेटचा हा सार्वभौम सम्राटही भारावून गेला होता.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाचे खाते उघडताना मीराबाईने रजतपदकाची कमाई केली. तिने या स्पर्धेत 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलून रजतपदकाला गवसणी घातली. मीराबाईने पदक जिंकल्यानंतर सचिननेही तिचे कौतुक केले होते. मायदेशी परतल्यावर काही काळ आपल्या कुटुंबीयांसमवेत व्यतीत केल्यानंतर बुधवारी मीराबाईने सचिनची भेट घेतली, त्याला रजतपदकही दाखवले. यावेळी सचिनने तिचे कौतुक केले मात्र, त्यालाही काय बोलावे हे सुचत नव्हते इतका तो भारावून गेला होता.
टोकियोत रजतपदक मिळवले त्यासाठी तुझे अभिनंदन. आता या पदकाचा रंग पॅरिसमध्ये सोनेरी दिसावा यासाठी शुभेच्छा, अशा शब्दांत सचिनने आपल्या भावना व्यक्त केल्या.
2000 सालच्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या करनाम मल्लेश्वरीने ब्रॉंझपदक मिळवले होते. त्यानंतर यंदा मीराबाईने रजतपदकाची कमाई केली.
मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली. दुखापतीनंतर ज्या पद्धतीने तिने मेहनत घेत धडाक्यात पुनरागमन केले त्याचेच सर्वात जास्त कौतुक वाटते. संपूर्ण देशाला तुझ्या कामगिरीचा अभिमान आहे, असेही सचिनने तिचा गौरव करताना सांगितले.