मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह जगभरातील नामांकित फलंदाजांना त्यांच्या अवडीनूसार बॅट तयार करुन देणाऱ्या अश्रफ चाचांच्या मदतीला अखेर सचिन धावला.
आधी अन्य व्याधींमुळे रुग्णालयात दाखल असलेल्या अश्रफ यांना करोनाची बाधा झाल्याचेही समोर आल्यानंतर त्यांच्या उपचारांचा खर्च उचलत सचिनने त्यांना मदतीचा हात पुढे केला.
त्यांच्या उपचारांवर होणारा रुग्णालयाचा खर्चही सचिनच उचलणार असल्याचे सांगितले आहे. अश्रफ काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना किडनीचा विकार होता. अश्रफ यांचे मित्र प्रशांत जेठमलानी यांनी सचिनसह अनेक खेळाडूंना अश्रफ यांची मदत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, सुरूवातीला त्यांच्या मदतीसाठी एकही खेळाडू पुढे आला नव्हता.
अनेकांनी अश्रफ यांच्याकडून आपल्या आवडीच्या बॅट तयार करुन घेतल्या होत्या पण त्याचे पैसे दिले नव्हते. जेठमलानी यांनी केलेले आवाहन सचिनला समजल्यावर त्याने दूरध्वनीवरून अश्रफ यांच्याशी संवाद साधला व मदतीसाठी हात पुढे केला. करोनाची बाधा झाल्याचे समजल्यावर त्यांना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सचिनच्या सांगण्यावरून दाखल करण्यात आले आहे.
अश्रफ यांना करोना झाल्याचे सिद्ध झाल्यानंतर सचिनने रुग्णालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला व त्यांच्या उपचारांत कोणतीही त्रुटीी राहू नये अशी विनंतीही केली.
———–