चंदीगड – कोरोना विषाणू संकट दिवसेंदिवस गडद होत चाललं आहे. सामान्यांपासून ते हाय प्रोफाइल व्यक्तींपर्यंत कोरोना पोहोचल्याने सर्वांसाठीच हा आजार चिंतेचा विषय ठरला आहे. असं असलं तरी पंजाबमधील जनतेसाठी आज एक ‘पॉझिटिव्ह’ न्यूज हाती आली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे. काँग्रेस आमदार कुलबीरसिंग झीरा आणि निर्मल सिंग यांचा कोरोना अहवाल २८ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कामध्ये आले असल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतःला ७ दिवसांसाठी क्वारंटाईन केले होते.
आज पंजाब मंत्रिमंडळातील सहकारी, काँग्रेस आमदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपण कोरोना चाचणी केली असून ती निगेटिव्ह आल्याची माहिती दिली.
विशेष म्हणजे देशात कोरोना महासाथ आल्यापासून मुख्यमंत्री सिंग यांनी तीन वेळा कोरोना चाचणी करून घेतली आहे. तिन्ही वेळेस त्यांना कोरोना बाधा झाली नसल्याचं समोर आलं.
दरम्यान, कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने मुख्यमंत्री सिंग यांनी सेल्फ-क्वारंटाईनमधून बाहेर पडत असल्याचे देखील जाहीर केले.