एसटी कर्मचाऱ्यांचा मुक्काम आजही आझाद मैदानावरच; संपाबाबत पुढील भूमिका उद्या

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज राज्य सरकारने कर्मचाऱ्यांपुढे पगारवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती देताना कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन उद्या सेवेवर हजर रहावे असे आव्हान केले. मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियांवरून एसटी कर्मचारी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम असल्याचं दिसतंय.

दरम्यान, या पत्रकारपरिषदेस आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले माजी मंत्री सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. पत्रकारपरिषदेनंतर त्यांनी आझाद मैदानात जाऊन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत माध्यमांशी संवाद साधताना संपाबाबतची पुढील भूमिका उद्या सकाळी मांडू असे सांगितले. त्यांनी मांडलेल्या या भूमिकेमुळे आझाद मैदानावर सुरु असलेले आंदोलन आजची रात्र तरी सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय.

सेवेत हजर न झाल्यास कारवाई

पत्रकारपरिषदेमध्ये बोलताना अनिल परब यांनी, एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन उद्या (गुरुवारी) सेवेत हजर रहावे, मुंबई येथे जमलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्यासाठी एका दिवसाची मुभा दिली जाईल. मात्र सेवेत हजर न झाल्यास राज्य सरकार कारवाई करेल असं स्पष्ट केलं होत.

कर्मचारी ठाम     

मात्र सरकारने पगारवाढीचा निर्णय घोषित केल्यानंतर देखील एसटी कर्मचारी आपल्या विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असून सरकारच्या प्रलोभनांना बळी पडणार नाही अशी भूमिका मांडली आहे. जर कर्मचारी संपावर ठाम राहिले तर राज्य सरकार कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांशी प्रभातचा संवाद

पुणे येथील स्वारगेट परिसरात आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांशी डिजिटल प्रभातने संवाद साधला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत विलीनीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत संपावरून मागे हटणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेली पगारवाढ ही आंदोलनात फूट पाडण्यासाठी सरकारचा डाव आहे असा आरोप देखील केला.        

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.