पुणे – स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंटतर्फे आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत द गेम चेंजर्स आणि जीएसटी अँड कस्टम संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.
मुंढवा येथील लिजंडस् स्पोर्ट्स क्लब मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत देवदत्त नातूच्या 74 धावांच्या जोरावर द गेम चेंजर्स संघाने पीआयओसी संघाचा 54 धावांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. गेम चेंजर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 166 धावांचे आव्हान उभे केले. देवदत्त नातू याने 60 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांसह 74 धावा फटकावल्या. त्याला कर्णधार नौशाद शेख (52 धावा) याने सुरेख साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 68 चेंडूत 113 धावांची भागीदारी केली. पीआयओसी हरिकेन्स संघाचा डाव 20 षटकांत 112 धावांवर आटोपला. नीजर मोरे याने नाबाद 46 धावांची खेळी केली. गोलंदाजीमध्ये नौशाद शेख (2-31) व असिम काझी (2-21) यांनी अचूक गोलंदाजी केली.
दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात अक्षय करनेकर याच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जीएसटी अँड कस्टम संघाने पुनित बालन संघाचा केवळ 8 धावांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना जीएसटी संघाने 19.1 षटकांत 10 गडी गमावून माफक 113 धावांचे आव्हान उभे केले.
यामध्ये तुशार श्रीवास्तव (20 धावा), रोहन मारवाह (16) व अक्षय करनेकर (17) यांनी संघाचा डाव उभा केला. पुनित बालन संघाच्या दर्शित मोदी याने 19 धावात 5 गडी टिपले. या आव्हानाचा पाठलाग करताना पुनित बालन ग्रुप संघाचा डाव 19.4 षटकांत व 105 धावांवर आटोपला. शुभम रांजणे (37 धावा) आणि महेश शिंदे (24) यांच्यानंतर खेळपट्टीवर कोणीही टिकाव धरू शकले नाही. जीएसटी संघाने 8 धावांच्या फरकाने विजय मिळवत आगेकूच केली.
संक्षिप्त धावफलक –
1) द गेम चेंजर्स : 20 षटकांत 4 बाद 166 धावा. (देवदत्त नातू 74, नौशाद शेख 52, सुदीप पाठक 2-20, प्रतीक दोशी 2-16). वि. वि. पीआयओसी हरिकेन्स ः 20 षटकांत सर्वबाद 112 धावा. (नीजर मोरे नाबाद 46, ऋतुराज वीरकर 27, नौशाद शेख 2-31, असिम काझी 2-21). सामनावीर ः देवदत्त नातू.
2) जीएसटी अँड कस्टम : 19.1 षटकांत सर्वबाद 113 धावा. (तुशार श्रीवास्तव 20, रोहन मारवाह 16, अक्षय करनेकर 17, दर्शित मोदी 5-19, महेश शिंदे 2-20, अक्षय जाधव 2-5) वि. वि. पुनित बालन ग्रुप ः 19.4 षटकांत सर्वबाद 105 धावा. (शुभम रांजणे 37, महेश शिंदे 24, महेश पाटील 2-18, प्रदीप दाढे 2-19, अक्षय करनेकर 2-19). सामनावीर ः अक्षय करनेकर.