ओस्लो (नॉर्वे) – नॉर्वेच्या किनारपट्टीवर काही बेलुगा व्हाईट व्हेल मासा आढळून आला आहे. त्या माशांच्या गळ्यामध्ये “सेंट पीटर्सबर्ग’च्या नावाचा एक पट्टी बांधलेली आहे. या गळपट्टीमध्ये चक्क एक कॅमेरा असावा आणि या व्हेल माशांच्या माध्यमातून रशियाने हेरगिरी सुरू केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जायला लागला आहे. ही गळपट्टी नॉर्वेच्या मच्छिमारांनी व्हेल माशांच्या गळ्यातून काढली आहे.
अधिकाऱ्यानी या प्रकाराची चौकशी केली असता त्यांना या बेलुगा व्हेलच्या गळ्याला बांधण्यात आलेल्या पट्ट्यावर इक्युपेमंट ऑफ सेंट पीट्सबर्ग असे लिहिलेले आढळून आले. यावरून हा प्रकार सामान्य नसून तो गुप्तचर यंत्रणेसाठी हेरगिरी करणारा व्हेल मासा असावा, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
बेलुगा व्हेलमाशाला बोली भाषेत पांढरा व्हेल म्हणतात. हा व्हेल प्रजातीतील सर्वात छोटा व्हेल आहे. बेलुगा व्हेलचा आकार 20 फुटांपर्यंत असतो.
रशियाकडे अशा प्रकारचे अनेक घरगुती व्हेल आहेत. या व्हेलपैकीच काही मासे समुद्रात सोडले असण्याची शक्यता आहे. अशी माहिती, आर्कटिक विद्यापीठातील मरीन बायॉलॉजीचे प्रोफेसर आडन रिकॉर्डसन यांनी सांगितली आहे.
व्हेलच्या गळ्यातील हा कॅमेरा रशियाच्या नौसेनेचा असण्याची शक्यता असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी प्रसारित केल्या आहेत.