तीव्र दुष्काळावर निवडणुकीचे पांघरूण

प्रशासन अन्‌ लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष पाण्याअभावी नागरिकांच्या तोंडाला येतोय फेस

विनोद पोळ

लोकप्रतिनिधींसह प्रशासन ढिम्म

वाई तालुक्‍याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सध्या दुष्काळाने भीषण रूप धारण केले आहे. चांदकसह परिसरातील गावांमध्ये दहा ते पंधरा दिवसांनी पाणी येत आहे. शिवाय प्रशासनाने सुरू केलेले टॅंकरदेखील कधी येतात तर कधी येतच नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनापुढे गाऱ्हाणे मांडूनही त्यांच्याकडून दुर्लक्षच होत असल्याने जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनही ढिम्म असल्याचेच दिसत आहे.

“कवठे-केंजळ’मध्ये आमचा समावेश नाही का?

कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चून कवठे-केंजळ योजना कशीबशी कार्यान्वित झाली. मात्र, या योजनेचे पाणी ठराविक गावांनाच मिळाले आहे. दरम्यान, चांदकसह परिसरातील आणखी काही गावांचा या योजनेत समावेश आहे. परंतु, या गावांना अद्याप या योजनेच्या पाण्याचा थेंबही बघायला मिळालेला नाही. त्यामुळे “कवठे-केंजळ’मध्ये आमचा समावेश नाही का? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थांमधून होत आहे.

कवठे – राज्यभर उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान दररोजच चाळीशी गाठत आहे. सातारा जिल्ह्यातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. तापमान वाढल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील ही दुष्काळी परिस्थिती लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अक्षरश: झाकोळली असल्याचेच म्हणावे लागेल. कारण पाण्यासाठी गावे मतदानावर बहिष्कार टाकत आहेत, कुठे रस्तारोको केला जात आहे. परंतु, लोकप्रतिनिधींसह प्रशासनाकडून या सर्व गोष्टींसह दुष्काळाकडे सोयीस्करपणे दुर्लक्षच केल्याचे निदर्शनास येत आहे.

वाई तालुक्‍याच्या पूर्व भागातील चांदक, गुळुंब, वेळे, वहागाव, सुरुर, कवठे यासह परिसरातील वाडीवस्तीवरील लोक विशेषत: महिला पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. प्रारंभी वेळे गावातील ग्रामस्थांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नागरिकांनी मतदान केले. तरीही लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाचा कुणी माणूसही या गावांकडे फिरकला नाही. या गावांमधील पाण्याची परिस्थिती जाणून घेण्यात नो लोकप्रतिनिधींना धन्यता वाटत आहे ना प्रशासनाला. गत महिनाभरापासून येथील जनतेच्या घशाला कोरड पडली असून पाण्यासाठी वणवण करत असताना या ग्रामस्थांचा विशेषत: महिलांच्या तोंडाला फेस येत आहे.

सुरुवातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून टॅंकर व्यवस्था करण्यात आली. मात्र, यात सातत्य राहत नसल्याने ग्रामस्थ बेजार झाले आहे. सध्या निवडणुका झाल्याने लोकप्रतिनिधींनी सुटकेचा श्‍वास सोडला असून या दुष्काळी परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, “एका लुगड्यात बाई म्हातारी होत नाही’ या म्हणीचा वारंवार उल्लेख करून लोकसभा झाली म्हणून काय झाल? आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही अशा संतप्त प्रतिक्रिया वाई तालुक्‍याच्या पूर्व भागातील दुष्काळी जनतेतून होत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्येही दुष्काळी परिस्थिती आहे. त्याठिकाणीदेखील अशाच प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.