ताल्लिन्न (रशिया) :- मॉस्को आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा आरोप रशियाकडून करण्यात आला आहे. हा ड्रोन हल्ला झालेल्या मॉस्कोतील एका इमारतीवर दोनच दिवसांपूर्वीच युक्रेनने अशाच प्रकारे ड्रोन हल्ला केला होता. या ड्रोन हल्ल्यामुळे युक्रेनचा प्रतिहल्ला दिसून येत असल्याचे रशियाने म्हटले आहे.
तर आता युद्ध “रशियाच्या हद्दीत होत आहे.’ असा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी केला आहे. मात्र या ड्रोन हल्ल्याची जबाबदारी त्यांनी घेतली नाही.
युक्रेनची दोन ड्रोन पाडली आणि एक ड्रोन निष्क्रीय केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. निष्क्रीय केलेले ड्रोन पडल्यामुळे मॉस्कोतील एका टोलेजंग इमारतीचे नुकसान देखील झाले आहे. ज्या इमारतीवर हे ड्रोन कोसळले त्याच इमारतीवर रविवारीच युक्रेनचा ड्रोन हल्ला झाला होता.
या इमारतीमध्ये रशियाच्या आर्थिक विकास मंत्रालय, डिजिटल विकास आणि दळणवळण मंत्रालय आणि उद्योग आणि व्यापार मंत्रालयाच्या मुख्यालयासह अनेक महत्वाच्या सरकारी संस्थांची कार्यालये आहेत. या एकाच इमारतीवर युक्रेनने लागोपाठ दोनवेळा ड्रोन हल्ला का केला हे समजू शकले नाही.
युक्रेनने सागरी ड्रोन वापरून काळ्या समुद्रात रशियाच्या दोन जहाजांवर देखील हल्ला केल्याचा आरोप रशियाच्यावतीने करण्यात आला आहे. रशियाने अलिकडच्या काळात मध्य युक्रेनमधील क्रिवयी रिह या शहरावर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केला होता. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून युक्रेनकडून रशियाची राजधानी मॉस्को आणि रशियाने ताब्यात घेतलेल्या क्रिमियावर ड्रोन हल्ले सुरू केले आहेत.