मुंबई – ‘जवान’ चित्रपटातील ‘जिंदा बंदा’ हे पहिले गाणे रिलीज झाल्याने ‘जवान’ भोवतीचा उत्साह नव्या उंचीवर पोहोचला आहे. पठाणनंतर शाहरुखच्या जवान चित्रपटाची चाहत्यांना खूप प्रतीक्षा आहे. अशात जवानचं जबरदस्त गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
अनिरुद्धच्या उत्कृष्ट संगीतमय जल्लोषात रिलीज झालेलं हे गाणं प्रत्येकाला आपल्या तालावर थिरकायला भाग पाडणार आहे. हे गाणे प्रसिद्ध शोबीने कोरिओग्राफ केले आहे. शाहरुख खानची आयकॉनिक पोज यांच्यासह दमदार डान्स या गाण्यामध्ये पाहायला मिळत आहे.
हे गाणे पाच दिवसांमध्ये चित्रित करण्यात आले होते आणि त्याचा परिणाम म्हणजे एक भव्य दिव्य कलाकृती परिपूर्ण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या गाण्यात शाहरुख खानचा अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडताना दिसत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला चांगली पसंती मिळत असून फॅन्स एसआरकेवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानबरोबर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता विजय सेतुपती, अभिनेत्री दीपिका पदुकोण देखील दिसणार आहे.