कीव : रशिया युक्रेन मागच्या सात दिवसांपासून सातत्याने हल्ला करत आहे. आज पहाटे रशियाच्या हल्ल्यात झपोरीझियामध्ये अणुऊर्जा प्रकल्पात आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे. आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत. युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रवक्त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. युक्रेनच्या एनरहोदर शहरातील वीज केंद्रावर रशिया हल्ला केला. यातील अणुऊर्जा प्रकल्पामध्ये आग लागली असून ही आग किती मोठी आहे हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियाने युक्रेवर केलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेसह अनेक युरोपीन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. मात्र तरीही रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे. या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. दुसरीकडे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोमवारी शहरावर ताबा मिळवण्याचा दावा केला होता.
⚡️⚡️Zaporizhzhya NPP continues to be shelled pic.twitter.com/KsZXqTNVb3
— NEXTA (@nexta_tv) March 4, 2022
एनरहोदर हे नीपर नदीवर वसलेलं एक शहर आहे. एनरहोदरमध्ये युरोपातील सर्वात मोठं अणुऊर्जा प्रकल्प आहे. युक्रेनच्या एकूण वीज उत्पादनाच्या जवळपास 25 टक्के उत्पादन या प्रकल्पामध्ये होते. याच अणुऊर्जा प्रकल्पाचे प्रवक्ते अँड्री तुज यांनी युक्रेनी टीव्हीला सांगितले की, “सध्या रिअॅक्टरच्या नुतनीकरणाचं काम सुरु होतं. त्यामुळे ते कार्यरत नव्हतं. परंतु प्रकल्पात परमाणु इंधन आहे. तर युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी आग लागल्यानंतर रशियन सैनिकांना युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला थांबवण्याचे आवाहन केले आहे.
कुलेबाने ट्वीट केलं आहे की, “रशियन सैन्य सातत्याने या प्रकल्पावर गोळीबार करत आहे. इथे आधीच आग लागली आहे, अशातच जर त्या प्रकल्पात स्फोट झाला तो चोरनोबिलपेक्षा 10 पट मोठा असेलं. यासाठी रशियन सैनिकांनी ताततीने हल्ला थांबवावा.” दरम्यान दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या संकटावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहे. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता तिसऱ्या फेरीची चर्चा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.