मॉस्को – रशियाने पाणबुडीतून हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. अण्वस्त्रसज्ज पाणबुडीतून ही चाचणी करण्यात आली होती. रशियाच्या लष्कराच्यावतीने ही माहिती देण्यात आली. झिरकॉन असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे आणि सेव्हेरोदविन्स्क या अण्वस्त्रसज्ज पाणबुडीतून या क्षेफणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
पाणबुडीतून अशाप्रकारे पहिल्यांदाच क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. यापूर्वी नौदलाच्या फ्रिगेटवरून अशाप्रकारची चाचणी घेण्यात आली होती. सर्वात अलिकडे जुलै महिन्यात अशी चाचणी घेण्यात आली होती.
झिरकॉन हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या वेगाच्या किमान नऊ पट अधिक वेगाने प्रवास करू शकते आणि त्याची मारक क्षमता 1 हजार किलोमीटर इतकी आहे, असे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी म्हटले आहे. रशियाच्या लष्करी सामर्थ्यामध्ये या क्षेपणास्त्रामुले मोठी वाढ होणार आहे, असेही पुतीन यांनी म्हटले आहे.
झिकॉन क्षेपणास्त्राच्या उर्वरित चाचण्या या वर्षाच्या उत्तरार्धात घेतल्या जाणार आहेत. पुढील वर्षी हे क्षेपणास्त्र रशियाच्या नौदलामध्ये सामील करून घेतले जाणार आहे. रशियाच्या युद्धनौका, लहान मारक बोटी आणि पाणबुड्यांवर हे क्षेपणास्त्र तैनात केले जाणार आहे.
यासारखी आणखीन काही होयपरसोनिक क्षेपणास्त्रे रशियाकडून विकसित केली जात आहेत. युक्रेनच्या क्रिमिया भाग रशियाने ताब्यात घेतल्यापासून रशिया आणि पश्चिमेकडील देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावामुळे रशियाने आपल्या संरक्षण सामर्थ्यामध्ये मोठी वाढ केली आहे.