मुंबई – राज्यात करोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार, तर घरगुती देवीची मूर्ती दोन फुटांची असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
राज्य सरकारने सोमवारी येत्या 7 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी आज मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना केल्या आहेत.
यावेळी 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी सरकार सज्ज झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जरी राज्यातील करोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी अजूनही धोका कायम असल्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये, अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहे. नागरीकांनी नवरात्रोत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून नवरात्रोत्सव मंडळांना पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे.
पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक असल्याचेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.