पुणे -ग्रामीण भागात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. अवघ्या 7 दिवसांत 838 बाधितांची भर पडल्यामुळे संख्या 2 हजार 272 वर जाऊन पोहोचली आहे. तर, नगरपालिका हद्दीत आतापर्यंत 596 बाधित सापडले आहेत.
हवेली, दौंड, शिरूर, मुळशी, खेड, मावळ आणि पुरंदर तालुक्यांत सर्वाधिक बाधित सापडत आहेत. सोमवारी (दि. 13) दिवसभरात 128 रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये एकट्या हवेली तालुक्यात सर्वाधिक 63, मुळशी 12, खेड 17 आणि मावळमध्ये 11 बाधितांचा समावेश आहे. हवेली तालुक्यात सर्वाधिक 918 बाधित सापडले असून, असाच संसर्ग वाढत राहिल्यास हवेली तालुका लवकरच 1 हजाराचा टप्पा पार करेल.
तसेच खेड तालुक्यात 281, मुळशी 236, जुन्नर 141, मावळ 151, शिरूर 124, तर आंबेगावमध्ये 96 बाधित संख्या आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 46 बाधितांचा मृत्यू झाला असून, 852 जण बरे झाले आहेत. सात दिवसांपूर्वी जिल्ह्यात केवळ 785 बाधितांवर उपचार होते. मात्र, आता ही संख्या दुप्पट 1 हजार 374 झाली आहे. दरम्यान, नगरपालिका हद्दीतही प्रादुर्भाव वाढत असून, आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. 345 बाधितांवर उपचार सुरू आहेत.