प्रियांकांकडील बंगला कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेस नेत्याचा प्रयत्न – पुरींचा दावा
बंगला कायम ठेवण्यासाठी सरकारकडे विनंती केलेली नाही – प्रियांकांचा खुलासा
नवी दिल्ली, दि. 14 – प्रियांका गांधी यांच्याकडे असलेला दिल्लीतील सध्याचा बंगला सरकारने एखाद्या कॉंग्रेस खासदाराला प्रदान करावा, म्हणजे त्या खासदारामार्फत प्रियांका गांधी हा बंगला त्याच्या नावावर वापरू शकतील अशी विनंती एका ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्याने आपल्याकडे केली असल्याची माहिती केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केली.
आज दिली. तथापि आपण आपला बंगला कायम ठेवण्यासाठी किंवा तो खाली करण्याची मुदत वाढ देण्यासाठी सरकारला विनंती केलेली नाही असा खुलासा खुद्द प्रियांका गांधी यांनी केला आहे. आपल्या नावावरील 35 लोधी ईस्टेट हा बंगला आपण नोटीशीतील मुदतीप्रमाणे 1 ऑगस्टला खाली करणार आहोत असेहीं प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.
त्या संबंधात बोलताना केंद्रीय मंत्री पुरी म्हणाले की कॉंग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपल्याला अशी गळ घातली की सरकारने हा बंगला एखाद्या कॉंग्रेस खासदाराला त्याच्या नावावर द्यावा म्हणजे त्याच्यानावावर प्रियांका गांधी त्यांच्या सध्याच्या बंगल्यात राहु शकतील.
तथापि त्याच्या विनंतीनुसार सरकारने प्रियांका गांधी यांनी सदर बंगला सोडण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने प्रियांकांना 1 जुलै रोजी नोटीस बजाऊन त्यांना 1 ऑगस्ट पर्यंत बंगला खाली करण्यास सांगितले आहे.
आपण सरकारकडे बंगल्यासाठी मुदतवाढ मागितली असल्याची बातमी खोटी आहे असे ट्विट प्रियांका गांधी यांनी केल्यानंतर पुरी यांनी दुसरे ट्विट करून वरील माहिती दिली आहे. त्यावरही प्रियांका यांनी त्यांना पुन्हा प्रत्युत्तर देऊन आपण सरकारकडे अशी विनंती केलेली नाही असे स्पष्ट केले आहे.
एखाद्याने तुमच्याकडे वरील प्रस्ताव दिला असेल तर त्याच्या चिंतेबद्दल मी त्याची आभार मानते, पण त्याने मी केलेल्या दाव्याची वस्तुस्थिती बदलत नाही, मी सरकारकडे बंगला सोडण्यास मुदत वाढ द्यावी अशी विनंती केलेली नाही असेही प्रियांकांनी स्पष्ट केले आहे.