मेष : शुक्राची साथ
व्यवसाय व नोकरीत उत्तम संधी चालून येतील. आर्थिकप्राप्ती समाधानकारक राहील. शुक्राची साथ दिलासा देईल. नवीन मोठ्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील. सर्व कार्यांत यश मिळेल. बेकारांना नवीन नोकरी मिळेल. नोकरदारांना विशेष लाभ होतील. महिलांनी घाईघाईने निर्णय घेऊ नयेत; कामे मनाप्रमाणे होतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
वृषभ :अनपेक्षित लाभ
धार्मिक व सामाजिक कामात विशेष रस घ्याल. अर्थप्राप्ती मनाप्रमाणे होईल. व्यवसायात अनपेक्षित लाभाची शक्यता. परदेशगमनाची संधी येईल. नोकरीत बदल किंवा बदलीस अनुकूल वातावरण लाभेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. महिलांना आवडत्या छंदातून प्रसिद्धी मिळेल. घरात मंगलकार्ये ठरतील. नातेवाइकांच्या भेटीने आनंद मिळेल. विद्यार्थ्यांचा उत्साह वाढेल.
मिथुन :पूरक ग्रहमान
मानसिक आरोग्य चांगले राहील. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे चीज आता होईल. अनुभवांचा उपयोग होईल. नवीन कामे मिळतील. नोकरीत तणावाचे वातावरण दूर होईल. वरिष्ठांचे झालेले गैरसमज दूर होतील. कामानिमित्ताने प्रवास घडेल. महिलांचे आरोग्य चांगले राहील. आवडीच्या क्षेत्रात मन रमेल. विद्यार्थ्यांना अभ्यासास पूरक ग्रहमान लाभेल.
कर्क : सुवार्ता कळेल
मनातील सुप्त इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. बराच काळ रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील. व्यवसायात परिस्थितीनुसार तडजोडीचे धोरण ठेवावे. हितचिंतकांची साथ मिळेल. नोकरीत पैशांच्या हव्यासापोटी चुकीचा मार्ग अवलंबू नका. आवश्यक तेथे सहकारी व वरिष्ठांची मदत घ्या. सुवार्ता कळेल. राहत्या घराचे प्रश्न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी चिंतन-मनन करावे.
सिंह :मान-सन्मान मिळेल
स्वतःची आर्थिक व शारीरिक कुवत ओळखून पुढे जा. कामाचा व्याप वाढेल. व्यवसायात आर्थिक बाबतीत काटेकोर राहून व्यवहार करावे लागतील. जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित करा. नोकरीत केलेल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. मान-सन्मान मिळवाल. महिलांनी घरात सुसंवाद साधून कामे उरकावीत. मुलांनी अतिधाडस करू नये.
कन्या :आर्थिक प्रगती
महत्त्वाची कामे धसास लागतील. आर्थिक प्रगती उत्तम राहील. व्यवसायात ओळखीचा उपयोग होईल. चांगले बदल घडतील; दगदग, धावपळ वाढेल. नोकरीत महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पेलाल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. पैशांच्या व्यवहारात बेफिकीर राहू नका. महिलांना प्रियजनांच्या भेटीने आनंद मिळेल. सहजीवनाचा आनंद उपभोगाल.
तुळ :प्रसिद्धीचे योग
धार्मिक, सामाजिक कामांतून प्रसिद्धी मिळेल. व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. कामाच्या पद्धतीत बदल करून फायदा मिळवाल. अचानक धनलाभाची शक्यता. नोकरदार व्यक्तींनी वरिष्ठांचा मूड पाहून आपल्या मागण्या मांडाव्यात. कामात गुप्तता राखावी. हितशत्रूंपासून सावध राहावे. महिलांना घरात जबाबदारीची भूमिका पार पाडावी लागेल.
वृश्चिक : संधी मिळेल
तुमच्या मानी व अहंमन्य स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा, ते ठरवा. नवीन योजना साकार करताना सर्वांचे सहकार्य लाभेल. नोकरीत कामांना गती मिळेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र असे काम हातून घडेल. महिलांना सामाजिक व कलाक्षेत्रात प्रगतिपथावर राहणे शक्य होईल.
धनु : इच्छा फलद्रूप
व्यवसाय-नोकरीत अपेक्षित यश मिळेल. मनातील इच्छा-आकांक्षा फलद्रूप होतील. व्यवसायात कामांना मूर्तस्वरूप येईल. महत्त्वाचे करार-मदार ठरतील. पैशांचा अतिमोह मात्र टाळा. बेकारांना नोकरी मिळेल. अपेक्षित पत्रव्यवहार होतील. महिलांना आरोग्याची उत्तम साथ मिळेल. संततीकडून सुवार्ता कळेल. विद्यार्थ्यांना परदेशगमनाची संधी मिळेल. तरुणांना अपूर्व संधी चालून येतील.
मकर : यश मिळेल
युक्ती व शक्तीचा वापर करून व्यवसायात यश संपादन कराल. योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी कराल. कौशल्याचा वापर करून अभिनव धाडस कराल. पूर्वी अपूर्ण ठेवलेले बेत व आर्थिक कामे पूर्णत्वास जातील. नोकरदार व्यक्तींनी मिळालेल्या अधिकाराचा गैरवापर करू नये. नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे विचार जरी पटले नाहीत, तरी प्रतिउत्तर देऊ नये. मोफत सल्ला टाळा.
कुंभ : आत्मविश्वास वाढेल
अनुकूल ग्रहमान व वातावरणाची साथ लाभेल. व्यवसायातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मनाविरुद्ध जाऊन मोठी कामे करावी लागतील. त्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागेल. वसुलीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची तुमच्याकडून बरीच अपेक्षा राहील. तडजोडीचा अवलंब करून कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. आत्मविश्वास वाढेल. महिलांचा वेळ आवडत्या छंदात मजेत जाईल.
मीन : नवीन कामाची संधी
कामातील प्रगतीचा आलेख चढत जाईल, त्याचा आनंद मिळेल. आर्थिक स्थितीही उत्तम असेल. व्यवसायात बाजारातील चढ-उतारांकडे लक्ष द्या; त्याप्रमाणे कामात लवचिक धोरण ठेवा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नेटाने कामे पूर्ण करा. नोकरीत विनाकारण होणारी धावपळ कमी होईल. कामात बदलाची शक्यता. बेकारांना नवीन कामाची संधी. महिलांचा सणाच्या निमित्ताने नटण्या-मुरडण्यात वेळ जाईल. खर्च वाढेल.