बॉबी, मुसमुसत्या तारुण्याची कथा सांगणारा, आरके फिल्म्सच्या सिनेप्रवासातील एक महत्त्वपूर्ण सिनेमा. नुकतेच या सिनेमाला पन्नास वर्षे पूर्ण झाली. सुपरहिट ठरलेल्या या सिनेमाने आरके फिल्म्सच्या बुडत्या नावेस उभारी दिली म्हणूनही याचे खास महत्त्व. नवतारुण्यात पदार्पण केलेली डिंपल आणि नवखा ऋषी कपूर या जोडीने त्याकाळी साऱ्या सिनेरसिकांना वेड लावून
टाकले होते.
ग्रेटेस्ट शो मॅन असे बिरूद मिळविलेल्या राजकपूर यांनी त्यांचा महत्त्वाकांक्षी सिनेमा ‘मेरा नाम जोकर’ बनवून प्रेक्षकांसमोर आणला, पण तो सपशेल आपटला. आपटला काय कोसळलाच. त्याच्याबरोबर आरके बॅनरही कोसळले. या सिनेमासाठी राजकपूरने होते नव्हते ते सारे पणाला लावले होते. या अपयशाने त्यांच्या समोर कर्जाचे डोंगर उभे राहिले.
राज कपूर एका अशा सिनेमाचा विचार करीत होते जो त्यांना पुनर्स्थापित करण्याचे काम करेल. त्यांच्या लक्षात आले की लोकांना आशयघन सिनेमा नकोय, त्यांना पडद्यावर ताज्या सुंदर स्त्रीचा चेहरा हवा आहे, जिच्या केसांची चर्चा व्हावी, जिच्या गालाची, सौंदर्या, मादकतेची चर्चा व्हावी. व्यवसायाची ही गरज ओळखत राज कपूर यांनी बॉबीची बांधणी केली. त्यांना ही कल्पना आर्ची कॉमिक्सवरून सुचली आणि एक टीन एज लव्हस्टोरीने जन्म घेतला.
सिनेमा टवटवीत व्हावा म्हणून त्यांनी आपला सारा चमूच बदलला. जयकिशन निर्वतले असल्याने शंकर एकटेच होते. लता मंगेशकरांबरोबर त्यांचे मतभेद असल्याने त्या त्यांच्याबरोबर गात नसत आणि बॉबीसाठी लतादीदीचे असणे आवश्यक असल्याने लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना पाचारण केले गेले. गीतकार म्हणून आनंद बक्षी, विठ्ठल पटेल, इंदरजीत तुलसी यांना समाविष्ट केले गेले तर पटकथेचे काम ख्वाजा अहमद अब्बास आणि व्ही. पी. साठे यांच्याकडे सोपविण्यात आले.
खरं तर नायक म्हणून राजेश खन्नाला घ्यावे असा विचार होता पण त्यांचे मानधन परवडणारे नसल्याने, घरातल्या ऋषी कपूरला नायक म्हणून संधी दिली गेली. ऑडिशन होत नायिका म्हणून षोडष् वर्षीय डिंपलची निवड झाली. नीतू सिंग ही या स्पर्धेत होती. तिला सिनेमा नाही पण बॉबीचे निमित्त होत जीवनाचा साथीदार म्हणून ऋषी कपूर लाभला. इतर अभिनेत्यांमध्ये आपलाच मेहुणा प्रेमनाथला घेत राज कपूर यांनी तिथेही पैसे वाचवले. आपले साडू असलेले प्रेम चोपडा यांनाही राज कपूर यांनी चकवा देत सिनेमात आणणे. प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा! केवळ इतकाच संवाद त्यांच्या वाट्याला आला, खरं तर प्रेम इतक्याशा भूमिकेमुळे नाराज होते, पण राजकपूर पुढे चालेना. ही गोष्ट वेगळी की हा डायलॉग त्यांची सर्वकालीन ओळख होऊन गेला.
प्राणसारख्या दिग्गज अभिनेत्याने राज कपूर यांच्याशी ‘आह’ सिनेमापासून असलेल्या संबंधाची बूज राखत फक्त एक रुपया इतक्या मोबदल्यावर काम करणे कबूल केले. पण पुढे सिनेमा हिट झाल्यावर वाढीव मानधनावरून या दोघांत दुर्दैवाने बेबनावही झाला. साहस दृश्यांसाठी प्राण सहसा डुप्लिकेट वापरत नसत. पण सिनेमाच्या क्लायमेक्समध्ये प्राण वाहत्या पाण्यात बुडू लागले, दैव बलवत्तर, ते वाचले. हे आणि असे अनेक वेगवेगळी चमत्कारिक वळणे घेत सिनेमाचा प्रवास सुरू झाला. कलाकार घरातले आणि नवे असल्याने चित्रीकरणाने ही वेग धरला.
सिनेमातील संगीत हा जमेची बाजू ठरली. सारीच गाणी लोकांच्या ओठी विराजमान झाली. ऋषी कपूरला आपला आवाज देणारा शैलेंद्र मूलत: अभिनेता. पण व्ही. शांताराम यांच्या सूचनेप्रमाणे त्यांची ऋषी कपूरचा पार्श्वगायक म्हणून वर्णी लागली. शैलेंद्र यांच्या मखमली आवाजा सोबतच एक वेगळ्या आवाजाची ओळख दर्शकांना झाली. ती म्हणजे नरेंद्र चंचल. बेशक मंदिर मस्जिद तोडो… या गाण्यातील त्यांचा पल्ला अद्भुत ठरला.
सुपर हिट ठरलेले “हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाये’ हे गाणे गुलमर्गला हाइलॅंड पार्क या हॉटेलमध्ये चित्रित करण्यात आले, सिनेमा हिट ठरल्यावर तेही पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास आले. याच गाण्याच्या निर्मिती मागे घडलेली गंमत सांगावीशी वाटते. संगीतकार प्यारेलाल नवे घर बांधत होते, एकदा ते आनंद बक्षी यांना घर दाखवायला म्हणून घेऊन गेले. घराचा फेरफटका मारताना बक्षी म्हणाले, ये घर तो भुलभूलैया है, अंदर कोई आ नहीं सकता और आये तो बाहर जा नहीं सकता. इथून हम तुम एक कमरे में बंद हो या गाण्याचा जन्म झाला.
मैं मैके चले जाऊंगी हे गाणे बुंदेलखंडी लोकगीतावरून प्रेरित होते. पाकिस्तानी गायिका रेश्मा यांच्या, अँखियों को रहने दे अँखियों के कोल कोल या गाण्यावरून अँखियों को रहने दे अँखियो के आसपास, याची तजवीज झाली. रेश्मांनी या गाण्याच्या बदल्यात इंदिरा गांधी यांच्याशी भेट घडवून द्या, असा आग्रह धरला होता. राज कपूर यांनी तशी भेट घडवून आणली. बॉबीच्या दरम्यानच राजेश खन्ना यांचे डिंपल बरोबर लग्न झाले. सिनेमात दर्शविलेले ऋषी कपूर आणि प्राण यांचे नाते हे राज कपूर व त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या वैयक्तिक संबंधावर बेतलेले होते.
राज कपूर “आग’च्या आधी नर्गिसच्या आई जद्दनबाईना भेटायला गेले असता नर्गिसने त्यांच्यासाठी दार उघडले होते, त्या वेळी त्या भजी तळत होत्या आणि नकळत त्यांनी आपले हात केसावरून फिरविले तेव्हा हातातले बेसन त्यांच्या केसांना लागले, तो प्रसंग सिनेमात ऋषी डिंपलची पहिल्या भेटीत तसाच घेण्यात आला.
बॉबीची लोकप्रियता यावरूनही समजू शकेल की, त्यावेळी कॉंग्रेसमधून वेगळे होत बाबू जगजीवनराम एक मोठी सभा घेणार होते, लोकांनी त्या सभेकडे आकर्षित होऊ नये म्हणून नेमके सभेच्या वेळी दूरदर्शनवरून “बॉबी’ सिनेमा प्रसारित करण्यात आला.
बॉबीच्या संगीताचे, गाण्याचे श्रेय जरी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे असले तरी त्या चाली शंकर जयकिशन यांच्याच होत्या, असे दबक्या आवाजात बोलले जाते. पंचवीस लाखांत तयार झालेल्या या सिनेमाने पाच कोटी रुपयांच्यावर व्यवसाय मिळवला. हा सिनेमा रशियातही तुफान चालला. फारसी भाषेतही हा सिनेमा बनविला गेला. चार फिल्म फेअर पुरस्कार मिळवणाऱ्या बॉबीत, सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून मला मिळालेले पुरस्कार मी चिरीमिरी देऊन मिळवले होते, अशी कबुली नंतर ऋषी कपूर यांनी दिली होती.
सामान्य माणसाच्या पहिल्या प्रेमाच्या स्मृतींना चाळविणाऱ्या या सिनेमाचे नाव घेत राजदूत कंपनीने बॉबी जीटीएस या नावाने मोटारसायकल बाजारात आणली पण तिला लोकांकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सत्तरीच्या घरात असलेल्या मंडळींना आपल्या यौवनकाळाची आठवण करून देणारा हा सिनेमा, तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक मुलामुलीसाठी आजही आकर्षणाचा केंद्र ठरावा.
– सत्येंद्र राठी