- जुने टीव्ही शोधण्यासाठी नागरिकांची धावाधाव : टिव्ही मॅकॅनिक हैराण
पिंपरी – तीस-चाळीस वर्षांपुर्वी लाकडी कव्हर असलेल्या ब्लॅक ऍण्ड टिव्हींचा काळ होता. आता हे टिव्ही पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या जुन्या टिव्हींमधील लाल रंगाच्या व्हॉल्वच्या (छोटी डबी) विक्रीतून लाखो रुपये मिळत असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे टिव्ही मॅकॅनिक व जुने टिव्ही उपलब्ध असू शकणाऱ्या नागरिकांकडे याबाबत विचारणा होत आहे.
मात्र, हा व्हॉल्व नेमकी कोणती कंपनी अथवा व्यक्ती खरेदी करतो, याची माहिती समोर आलेली नाही. अथवा हा व्हॉल्व खरेदी करण्याची एकही घटना समोर आलेली नाही. त्यामुळे ही अफवाच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही नागरिक मात्र धावाधाव करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही नागरिकांकडून जुन्या काळातील लाकडी शटरच्या टिव्हींबाबत विचारणा होत आहे. सध्याच्या हायटेक रंगीत एलईडीच्या काळात हे टिव्ही खरेदी करण्याचे नेमके कोणते कारण आहे, याचे हे नागरिक कोणतेही समाधानकारक उत्तर देत नाहीत. केवळ असा टिव्ही एखाद्याकडे असेल, तर सांगा, अशी जुजबी विचारणा करत आहेत.
मात्र, आता कोणाकडेही असे जुने टिव्ही उपलब्ध नसल्याने, या नागरिकांनी आपला मोर्चा टिव्ही मॅकॅनिककडे वळविला आहे. मॅकॅनिककडे असलेल्या जुन्या टिव्हीच्या स्पेअर पार्टसमध्ये हा व्हॉल्व मिळविण्याची नागरिकांची धडपड सुरू आहे.
भारतात 1959 साली दूरचित्रवाणीचे आगमन झाले. तर 1965पासून देशातील विविध शहरांमध्ये दूरदर्शनाची सेवा मिळू लागली. त्यानंतर देशभरात ब्लॅक ऍण्ड व्हाईट (कृष्णधवल) टिव्हीची चलती सुरू झाली. या काळात काही ठराविक म्हणजेच आर्थिकस्थिती चांगली असलेल्या नागरिकांकडे टिव्ही दिसू लागले. त्याकाळात बुश, ओनिडा, क्राऊन, फिलिप्स अशा अनेक कंपन्या टिव्ही उत्पादनात आघडीवर होत्या. आता या कंपन्यांचे टिव्ही भंगारात पहायला मिळत आहेत.
जुन्या काळातील टिव्हीबरोबरच रेडिओ आणि ऍम्लिफायरमध्येदेखील असे व्हॉल्व लावले जात होते. मात्र, या व्हॉल्वला मिळणाऱ्या घसघसीत रकमेच्या अफवेमुळे नागरिकांकडून या टिव्हींच्या उपलब्धतेबाबत विचारणा होत आहे. ही अफवा असून, त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन आम्ही करत आहोत.
गणेश घुंडरे, टिव्ही मॅकॅनिक