बेथेस्डा (अमेरिका) – करोनाची लागण झालेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीसाठी आगामी 48 तास विशेष महत्त्वाचे आहेत. ट्रम्प यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेडोस यांनी शनिवारी ही माहिती दिली.
ट्रम्प यांना कोविड-19 ची खूपच सौम्य लक्षणे दिसत होती, पण तरीही व्हाईट हाऊसमध्येच त्यांना शुक्रवार सकाळपासून पर्यायी ऑक्सिजन दिला जाऊ लागला आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले होते, असे व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी सांगितले.
ट्रम्प यांच्या डॉक्टरांनी ट्रम्प यांच्या प्रकृतीविषयी वॉल्टर रीड नॅशनल मिलीटरी मेडिकल सेंटरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काळजीचे कारण नसल्याचे म्हटले होते. मात्र, नेव्ही कमांडर डॉ. सीअन कोन्ली यांनी आणि अन्य डॉक्टरांनी अधिकच काळजी व्यक्त केली. ट्रम्प यांना पर्यायी ऑक्सिजनची आवश्यकता आहे का, याबद्दल कोन्ली शंका उपस्थित केली. ट्रम्प नक्की कधीपासून आजारी पडले, हे सांगायला मात्र त्यांनी नकार दिला. गुरुवारी दुपारपासून ट्रम्प यांना कोविड-19 च्या संसर्गाची लक्षणे दिसायला लागली.
त्यापूर्वी पण त्यांना लक्षणे दिसत होती. मात्र, त्याचे स्वरूप सौम्य होते. ट्रम्प यांना गेल्या 24 तासांपासून ताप नव्हता, असे ते म्हणाले. सध्या ट्रम्प यांना ऑक्सिजनवर ठेवलेले नाही, हे डॉ. कोन्ली यांनी स्पष्ट केले, पण त्यापूर्वी ट्रम्प यांना ऑक्सिजन दिला होता की नाही, हे मात्र त्यांनी सांगण्यास नकार दिला.
ट्रम्प यांचा खोकला आणि सर्दी आता कमी झाली असून ते आता बरे आहेत, असे अन्य एक डॉक्टर सीअन डुली यांनी सांगितले.
व्हाईट हाऊसमध्ये विषाणूचा फैलाव झालेला असल्याने ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत प्रशासनाकडून पारदर्शकता ठेवली जात नाही आहे. प्रशासनाने ट्रम्प यांच्या प्राथमिक आरोग्याविषयीही पूर्ण माहिती दिलेली नाही. त्यांच्या चाचण्यांचे अहवाल काय आहेत, हे देखील सांगितले जात नाही. केवळ ट्रम्प यांना करोनाची लागण झाली अहे, असे प्रसारमाध्यमांना समजले, पण त्याबाबत व्हाईट हाऊसने सांगितले नव्हते. आणखी काही दिवस ट्रम्प यांना रुग्णालयातच ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर हॉस्पिटलमधील अध्यक्षांच्या दालनातूनच आपला कारभार बघणार आहेत.