कुरकुंभ एमआयडीसीत स्फोट झाल्याची अफवा

वासुंदे: कुरकुंभ (ता. दौंड) एमायडीसीमधील दोन कंपन्यांमध्ये मोठे स्फोट झाले असून, पुणे-सोलापूर महामार्गावरची वाहतूक थांबवली आहे, तसेच परिसरातील नागरिकांना 20 किलोमीटरपर्यंत हलविण्यात आले असल्याची अफवा करणारा मेसेज सोशल मीडियावरती फिरत असल्याने ऐन संक्रांतीच्या सणाच्या दिवशी प्रशासनाची तारांबळ उडाली असल्याचे या परिसरात दिसून आले.

या मेसेजवर पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस (ता. दौंड) येथील टोल प्लाझानजीकचे ट्राफिक जाम झाल्याचे फोटो व्हायरल केले जात होते, त्यामुळे कुरकुंभ व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अफवेमुळे कित्येक जणांनी आपल्या नातेवाइकांना संपर्क करत विचारपूसही केली. मात्र, असा कोणताही अपघात औद्योगिक वसाहतींमध्ये झाला नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, नागरिकांना विनाकारण सोशल मीडियाच्या या अफवेमुळे नाहक त्रासाला बळी पडावे लागले.


धोकादायक वातावरणात अफवांची भर

मागील काही महिन्यांपूर्वी औद्योगिक वसाहतींमधील धोकादायक समजल्या जाणाऱ्या अल्कली अमाईन्स केमिकल कंपनीमध्ये मोठी आग लागून परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, त्यामुळे सोशल मीडियावर पसणाराऱ्या या मेसेजमुळे नागरिकांना धक्का बसला. अशा धोकादायक कंपन्या व सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे कदाचित होत्याचे नव्हते होऊ शकते, अशा धोकादायक कंपन्यांना कोणाचं वलय आहे, हे सध्या तरी अंधारातच आहे. एवढी मोठी आग कंपनीत लागून काही दिवसांत चौकशी पूर्ण होऊन कंपनी पूर्ववत सुरू झाली, त्यामुळे प्रशासनाची कारवाई तुटपुंजी असल्याचेही दिसून येत आहे.


हार्मोनी ऑरगॅनिक्‍स कंपनीवर उत्पादन बंदीचे आदेश

कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्रकल्प बेकायदेशीरपणे घातक रसायनांचा साठा मोठ्या प्रमाणात करत असून यावर प्रशासनाची कुठेही कारवाई होत नाही. बेकायदेशीररीत्या साठवलेल्या रसायने वापर करून त्या माध्यमातून उत्सर्जित होणारे सांडपाणी, वायू प्रदूषण सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे. याप्रश्नी प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करत कुरकुंभ येथील हार्मोनी ऑरगॅनिक्‍स कंपनीवर उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत मात्र एवढ्यावरच येथील बेकायदेशीर रसायन साठा व प्रदूषण करणारे उद्योग थांबणार आहेत का? बेकायदेशीर उद्योग धंदे सुरू ठेवणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांवर मोठी कारवाई होणे गरजेचे आहे.


कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये असा कुठलाही अपघात झालेला नाही. नागरिकांनी सोशल मीडियावरील मेसेजवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास त्वरित पोलिसांची संपर्क साधावा. सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट व फोटो जुनेच आहेत.
– सुनील महाडिक, पोलीस निरीक्षक, दौंड पोलीस स्टेशन

Leave A Reply

Your email address will not be published.