कुरिअर कंपन्यांना आरटीओची नोंदणी बंधनकारक

नोंदणीबाबतचे प्रमाणपत्र नसल्यास संबंधितांवर नियमांनुसार कारवाई होणार

पुणे – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने आता कुरिअर कंपन्यांसह रस्त्यांवरून मालवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी बंधनकारक केली आहे. या नोंदणीबाबतचे प्रमाणपत्र नसल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई होणार आहे. आतापर्यंत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात 75 वाहनांची नोंद झाल्याचे आरटीओ कार्यालयाने सांगितले आहे.

शहरातून राज्यात व परराज्यांत मालवाहतूक करणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. या कंपन्यांकडून नागरिकांच्या घर-कार्यालयांपर्यंत विविध वस्तू रस्ते मार्गाने तातडीने पोहोचवण्याची सुविधा विविध कुरिअर कंपन्यांकडून दिली जात आहे.

प्रत्येक वर्षी या कंपन्यांची संख्या वाढत असून या वस्तू पोहोचवण्यासाठीची वाहनांची संख्याही वाढत आहे. यापूर्वी, आरटीओ कार्यालयांकडे या वाहनांसह कंपन्यांची कोणतीही माहिती नसल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्‍यता होती.

या कंपन्यांच्या वाहनांची सगळी माहिती आरटीओ कार्यालयांकडे राहावी, जेणेकरून वाहतुकीशी संबंधित धोरणात्मक निर्णय घेताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या कंपन्यांना आरटीओकडे नोंदणी बंधनकारक केली आहे.

केंद्र सरकारच्या या आदेशामुळे आरटीओ कार्यालयात माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, नोंदणी करणारे एजंट, वाहतूक कंपन्या, कागदपत्रे, मालाची घरपोच वाहतूक करणारी कुरिअर कंपनी, मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यावसायिक यांना प्रादेशिक किंवा उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे अर्ज करून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्‍यक आहे. हे प्रमाणपत्र संबंधित व्यावसायिकाने न घेतल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती “आरटीओ’ने दिली आहे.

मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांना प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी बंधनकारक आहे. यासाठी, संबंधितांनी अर्ज केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने राबवली जात असून नोंदणी न करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाणार आहे.
– संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.