पिंपरी – दसऱ्यानिमित्त वाहन नोंदणीच्या निमित्ताने मोशी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प झालेल्या वाहन खरेदीला आता प्रतिसाद मिळू लागला आहे. या आठवडयात वाहन नोंदणी, आकर्षक क्रमांक, वाहन हस्तांतरण अशा विविध कारणांसाठी नागरिकांची गर्दी वाढली होती. या मुहूर्तावर साडेतीन हजार वाहनांची नोंद झाली असून, त्यापोटी 24 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
गतवर्षी पेक्षा वाहन नोंद कमालीची घट पाहण्यास मिळाली. या आठवड्यात 1 हजार 923 दुचाकी वाहनांची तर, 1 हजार 460 मोटारीची नोंद झाली. 247 इतर अशी एकूण 3 हजार 360 वाहने नोंदवली गेली. तर, दसऱ्याच्या दिवशी केवळ एकूण 107 वाहने नोंद झाली आहेत. या माध्यमातून 24 कोटी 13 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याचे आरटीओ कार्यालयाकडून सांगण्यात आले.
यंदा करोनाच्या काळात वाहन उत्पादनासह सर्व साखळी व्यवसाय पूर्णत: ठप्प झाला होता. त्यामुळे दसरा दिवाळीनिमित्त विविध वाहन कंपन्यांकडून योजना देण्यात आल्या होत्या. ती खरेदीसाठी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन ताब्यात घेण्यासाठी धावपळ दिसून आली. त्यासाठी विविध मोटार कंपन्यांचे प्रतिनिधी “आरटीओ’ कार्यालयात सकाळपासून होते. वाहन नोंदणी विभाग आणि आकर्षक क्रमांक मिळण्यासाठी नागरिक येत होते.
रविवारी दसऱ्यानिमित्त शासकीय कार्यालय बंद असतात. मात्र, ग्राहकांना त्या मुहूर्तावर वाहन मिळावे आणि दुसरीकडे आरटीओ कार्यालयातील महसूल वाढविण्यासाठी कार्यालय खुले होते. वाहन नोंदणी संबंधित कर्मचारी नेमण्यात आले होते. त्यामुळे आता येत्या दिवाळीनिमित्त विक्रेत्यांना अधिक नोंदणीसाठी विविध उपाययोजना आखाव्या लागणार आहेत.