शिरुर (प्रतिनिधी): शिरूर शहरातील टपरी पुनर्वसन व्यापारी संकुल प्रकल्पासाठी ६ कोटी रुपयांची निधी, तर शिरूर शहरातील शहरांतर्गत पाषाण मळा ते 17 कमानी फुला पर्यंतच्या रस्त्यासाठी चार कोटी असा एकूण दहा कोटी रुपयांचा निधी शिरूर शहरासाठी मंजूर झाला असल्याची माहिती शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.
शहरातील झोपडपट्टीधारकांना स्वतःचे घर देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, शहरांतर्गत काही रस्त्याचा भाग काँक्रिटीकरण करणार असल्याचे यावेळी पवार यांनी सांगितले.
शिरुर शहराच्या विकासाच्या दृष्टीने शहराला मोठा निधी उपलब्ध करुन दिला असून, कोरोना संसर्ग व लॉक डाऊन कमी होताच ही कामे सुरू होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे शिरूर शहरातील गोरगरीब टपरीधारक यांना याचा फायदा होणार आहे. यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी नगरविकास खात्यातून मोठा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे आमदार अशोक पवार यांनी सांगितले.
या निधीच्या माध्यमातून शहरातील जुना नगर पुणे हा मुख्य रस्ता काँक्रीटकरणासाठी ४ कोटी रुपये मंजुर करण्यात आले अाहे. तसेच रस्ता रुंदी करण्यासाठी काढण्यात आलेल्या गोरगरीब टपरीधारकांना न्याय देऊन त्यांचे पुनर्वसन व्यापारी गाळ्यात करण्यासाठी एस टी बस स्थानकाजवळील जागा नगरपरिषदेस मिळुन दिली असुन या ठिकाणी मोठे व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.या कामासाठी ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याहीपेक्षा जास्त रक्कम राहिल्यास त्यासाठी प्रयत्न करणार आहे. याप्रमाणे नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांच्या सहकार्याने शहराचा विकास करावयाचा असुन एसआरए च्या धर्तीवर शिरूर शहरातील झोपडपट्टी असणाऱ्या भागात झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन उंच इमारती बांधून स्वतःच्या मालकीची पक्की घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न राज्य सरकारकडे चालू असल्याची माहिती शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी दिली.