साताऱ्यात दोन पोलीस कर्मचारी निलंबित  

सातारा : जिल्ह्यात येण्याचा परवाना नसल्याने टेम्पोचालकाकडून कुलर तर बेपत्ता मुलगीचा शोध लावण्यासाठी १० हजार रुपये घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी निलंबित केले आहे.

पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले व सध्या शिरवळ येथील शिंदेवाडी चेकपोस्टवर तैनात केलेले हवालदार जी.एन. घोटकर तर फलटण पोलीस ठाण्यातील गुलाब गलीयाल अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. ११ रोजी पुण्याहून एक टेम्पो सातारा जिल्ह्याच्या हद्दीत येत होता. यावेळी शिंदेवस्ती चेकपोस्ट परिसरात हवालदार जी.एन.घोटकर हे कर्तव्य बजावत होते. संबंधित टेंम्पो चालकाकडे सातारा जिल्ह्यात येण्याचा परवाना नव्हता. घोटकरने टेंम्पोमध्ये पाहणी केल्यानंतर त्यामध्ये कुलर होता. टेंम्पोतील तो कुलर द्या, व पुढे शिरवळकडे जा, असे सांगून घोटकरने तो टेम्पो सोडला.

पोलीस नाईक गुलाब गलीयाल हे फलटण पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. दि. २२ जून रोजी त्यांच्याकडे एका बेपत्ता प्रकरणाचा तपास देण्यात आला. याप्रकरणी गलीयाल तक्रारदारांना भेटले. ‘तुमची बेपत्ता झालेली मुलगी शोधून आणतो, असे सांगून त्यांनी १० हजार रुपये घेतले. दोन्ही पोलीस कर्मचाºयांचे संबंधित अहवल पोलीस मुख्यालयात पाठवण्यात आले होते. अहवाल आल्यानंतर त्याबाबत प्राथमिक माहिती घेतल्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घोटकर आणि गलीयाल या दोघांना निलंबित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.