कराड, (प्रतिनिधी) – कराड दक्षिण मतदारसंघाच्या आणि विशेषतः कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असलेले भाजपचे सातारा लोकसभा मतदारसंघ प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीतून कराडच्या विकासासाठी 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून कृष्णा नाका-वाखाण रोड-कोरेगाव-कार्वे-कोडोली या दहा किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण, ‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर पादचार्यांसाठी फूटपाथ व स्वतंत्र सायकल ट्रॅकही होणार आहे.
राज्यात रखडलेल्या विकासाला महायुती सरकारने पुन्हा चालना देताना, नवनव्या प्रकल्पांसाठी निधीची बरसात सुरू केली आहे. कराड दक्षिण मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांना ताकद देण्याचे धोरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवलंबले आहे. जनतेच्या हितासाठी कार्यरत असलेल्या डॉ. भोसले यांची प्रत्येक मागणी मान्य करत, भरघोस निधी दिला जात आहे.
डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नांमुळे गेल्याच आठवड्यात कराड दक्षिणमध्ये मंजूर झालेल्या 131 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. भोसले यांनी मतदारसंघात यापुढेही भरघोस निधी देण्याची मागणी केली होती. कराडच्या विकासासाठी मोठा प्रकल्प मंजूर करण्याची मागणीही त्यांनी होती.
याची दखल घेत, ना. चव्हाण यांच्या सूचनेनुसार राज्याच्या बांधकाम मंत्रालयाने कराड शहरातील रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीतून 50 कोटींचा निधी देण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्यानुसार कृष्णा नाका ते कोरेगाव ते कोडोली या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून या रस्त्याचे चौपदरीकरण, पादचार्यांसाठी फूटपाथ आणि स्वतंत्र सायकल ट्रॅक केला जाणार आहे. त्याशिवाय या रस्त्यावर प्रसाधनगृहे, स्वच्छतागृहे, पार्किंग लॉट, सायकल पार्किंग स्टँड अशा सुविधा मिळणार आहेत. या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
डॉ. अतुल भोसले यांना बळ
डॉ. अतुल भोसले हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. डॉ. भोसले यांच्या प्रत्येक मागणीची पूर्तता करून, भाजपकडून त्यांना बळ दिले जात आहे. त्यांच्यामुळे कराड दक्षिणमधील विकासकामांसाठी भरघोस निधी मिळत आहे.