पिंपरी (प्रतिनिधी) – राज्यातील महापालिका क्षेत्रामध्ये फेरीवाला कायद्याची व महाराष्ट्र नियम २०१६ याची अंमलबजावणी करण्यात यावी व त्यांचेवरील अन्यायकारक कारवाई थांबविण्यात यावे, या व इतर मागण्यांसाठी शहरासह राज्यातील कष्टकऱ्यांनी मुंबई येथे आज आंदोलन केले. नॅशनल हॉकर फेडरेशनचे राष्ट्रीय समन्वयक मेकॅजी डाबरे, महासंघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिव विनिता बाळेकुंद्री यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आमदार रोहित पवार, आमदार अशोक पवार, आमदार शशिकांत शिंदे यांनीही या आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानासमोर वडापाव विक्री तसेच भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात आले होते.
मात्र ऑगस्ट क्रांती मैदानाजवळ पोलिसांनी आंदोलकांना रोखले. दरम्यान या आंदोलनाची सरकारने दखल घेत नगर विकास विभागाचे सचिव शंकर जाधव, नगरपरिषद प्रशासनाचे शंकर गोरे यांचे सोबत सकारात्मक बैठक झाली. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानासमोरचे आंदोलन थांबवून आझाद मैदान गाठले व आंदोलन सुरू करण्यात आले.
या आंदोलनात इरफान चौधरी, फरीद शेख, सुरज देशमाने, मनोज यादव, नंदा तेलगोटे, जरीता वाठोरे, शारदा राक्षे, महादेव स्वामी, राजू माने, मारुती भालेराव, नेताजी सदूवाले, शंकर मोकळ, योगेश मसने, बाळकृष्ण वाणी, सखाराम केदार, कासिम तांबोळी, हरीभोई, लक्ष्मण मेहेर, वसंत जाधव, अलका सूर्यवंशी, शकीला शेख, सविता हिंगणकर, संगीता भोळे यांचे सह राज्यातील व शहरातील विक्रेत्यांनी सहभाग नोंदवला.