स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात संसदेच्या दोन्ही सभागृहात महिला सदस्यांची संख्या वाढली आहे. परंतु काही दिवसांपूर्वी राज्यसभेत देशातील दुर्गम राज्य नागालॅंडमधील एका महिला सदस्येने शपथ घेतली तेव्हा तिने इतिहास रचला.
गेल्या सहा दशकांत नागालॅंडच्या इतिहासात संसदेत जाणाऱ्या एस. फांगनोन कोन्याक या राज्यातील दुसऱ्या महिला सदस्य आहेत. यापूर्वी चार दशकांपूर्वी 1977 मध्ये रानो एम. शाजा या लोकसभेवर निवडून आल्या होत्या. यावरून नागालॅंडच्या महिलांसाठी कोन्याक यांची कामगिरी किती महत्त्वाची होती, हे लक्षात येते. नागालॅंडमध्ये अजूनपर्यंत एकही महिला आमदार झालेली नाही. कोन्याक यांना भाजपने राज्यसभेपर्यंत पोचण्याची संधी दिली. कोन्याक या नागालॅंडच्या भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. त्या एका अर्थाने बिनविरोधपणे राज्यसभेत पोचल्या आहेत. कोन्याक यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात शेवटच्या आठवड्यात पारंपरिक वेशभूषेत येऊन सदस्यत्वाची शपथ घेतली. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, पारंपरिक वेशभूषा आणि संस्कृती ही आपल्या जनतेचा आवाज सरकारी दरबारी पोचवण्यासाठी शक्ती आणि धैर्य प्रदान करेल. कोन्याक यांनी सक्रिय राजकारणाला विद्यार्थी दशेपासूनच सुरुवात केली.
राजकारणाशिवाय त्या समाजसेविकादेखील आहेत. 2017 रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी अनेक संस्थेच्या माध्यमातून लोकांची कामे केली. 2020 मध्ये त्यांना भाजप महिला आघाडीचे अध्यक्षपद सोपवले. 44 वर्षीय कोन्याक या नागालॅंडच्या मोन जिल्ह्यातून येतात. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून 2002 मध्ये इंग्लिश साहित्यात एमए केले. तत्पूर्वी त्यांनी दीमापूरच्या होलीक्रॉस हायर सेकेंडरी स्कूलमधून शिक्षण घेतले. विशेष म्हणजे कोन्याक या मोन जिल्ह्यातील ओटिंग गावातील आहेत. या ठिकाणी गेल्या वर्षी एक मोठी दुर्घटना घडली आणि त्यात स्थानिक नागरिक मारले गेले.
कोन्याकदेखील त्याच समुदायातून येतात. कोन्याक यांच्या मते आपले लक्ष आता नागालॅंडच्या विधानसभा निवडणुकीकडे आहे. या ठिकाणी राज्यातील महिलांना विधानसभेत पोचवण्यासाठी प्रेरित केले जाईल, असे कोन्याक सांगतात.
– वर्षा शुक्ल