चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
मुंबई : अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरातील रोल्टा टेक्नॉलॉजीज या आयटी कंपनीला भीषण आग लागली. ही आग कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रुमला लागली. तब्बल चार तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. ही आग लेव्हल-4 ची असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
अंधेरी पूर्व एमआयडीसी परिसरात रोल्टा टेक्नॉलॉजीज ही आयटी कंपनी आहे. शॉर्ट सर्किटमुळे गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास या कंपनीच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्व्हर रुमला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दुपारी एकच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळेल असे वाटले. मात्र, ही आग आणखी भडकली, दुसऱ्या मजल्यावरुन ती वरच्या मजल्यापर्यंत पोहोचली. वरच्या मजल्यावरील ट्रान्सफॉर्मर्समुळे आग आखणी वाढली. त्यामुळे अग्निशमन दलाच्या आणखी गाड्या मागवण्यात आल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी 70 मीटर उंच शिडीच्या सहाय्याने वरच्या मजल्यावर पोहोचले, इमारतीच्या काचा फोडून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश आले आणि आग आटोक्यात आली.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. आग इतकी भीषण होती की धुराचे मोठ-मोठाले लोळ हवेत उठत होते. दरम्यान, खबरदारी म्हणून परिसरातील इतर इमारती रिकाम्या करण्यात आल्या. परिसरातील इतर कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांना श्वसनाचा त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले.