दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल
नवी दिल्ली : नवी दिल्लीत गार्गी महिला महाविद्यालयात गेल्या आठवडयात एका सांस्कृतिक महोत्सवादरम्यान विद्यार्थिनींच्या कथित विनयभंग प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला, सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. याबाबत दिल्ली उच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्यासाठी याचिकाकर्त्यानी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सांगितले आणि या याचिकेवरील सुनावणीला नकार दिला.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुआर दिल्ली उच्च न्यायालयामध्ये या संबंधीची याचिका दाखल करण्यात आली आहे. कॉलेजच्या आवारातील सीसीटिव्हीचे चित्रीकरण राखून ठेवण्यात यावे, अशी मागणीही या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. या गुन्हेगारी कारस्थानामागील व्यक्तींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणीही या याचिकेत केली गेली आहे.
6 फेब्रुवारीला महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी नसलेल्या 10 जणांच्या एका टोळक्याने विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थिनींचा छळ केल्याचा आरोप गार्गी महविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी केला आहे.