राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीमधील एक गट हा अजित पवार यांना पाठिंबा देणारा आहे. तर दूसरा गट शरद पवार यांना साथ देणारा आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे नेते आता शरद पवार यांच्यावरच आरोप करत आहेत. मात्र शरद पवार यांचे राजकीय विरोधक असलेले आणि माजी मंत्री व रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांचा ‘सैतान’ म्हणून उल्लेख केला आहे
“शरद पवार हे सैतान आहेत. ते गावगाड्याकडे पुन्हा येता कामा नये, ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पुतण्यापासून मला वाचवा अशी हाक शरद पवार देत आहेत. जे घडत आहे, तो नियतीने उगवलेला सूड आहे”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली. यावर आता रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. “सदाभाऊ खोत यांनी मर्यादेत राहावं. मराठी बाणा आणि रांगडी भाषा दाखवायची असेल तर आम्हीही दाखवू शकतो. बातमी होण्यासाठी जर तुम्ही तुमची लायकी सोडत असाल तर आम्ही शांत बसणार आहोत का?,” असा सवाल रोहित पवार यांनी केला.
“तुमची सत्ता आहे ते ठीक आहे. तुमची घुसमट होत आहे. तुम्हाला आमदारकी मिळत नाही म्हणून टिमकी वाजवत असाल. पण जर लोकांनी तुमची टिमकी वाजवायला सुरुवात केली तर तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही.” असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
सदाभाऊ खोत काय म्हणाले होते?
“शरद पवार सैतान असून त्यांच्यावर नियतीने मोठा सूड उगवला आहे. या सैतानाला त्याचे पाप सध्या फेडावे लागत आहे. गाव गाड्यात हा सैताना पुन्हा येता कामा नये. त्याने नवं सरकार उभं करता कामा नये हे आमचं मुख्य काम आहे. गावगड्याला आता लढाई लढावी लागणार आहे,” असं सदाभाऊ खोत म्हणाले होते.