पिंपरी – राज्यातील महिलांचे प्रश्न सोशल मीडियावर रील्स बनवून सुटत नाहीत. तर त्यासाठी आधी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासारखे लोकांच्या मनातील रिअल स्टार्स बनावे लागते. तरच प्रश्न सोडविले जातात, अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर केली.
पिंपरी-चिंचवड शहरात खडसे यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभेत बैठकांचे आयोजन करण्यात आले. या वेळी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कसे काम करावे, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. या वेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, संदीप चव्हाण, सचिन निंबाळकर, राजेश हरगुडे, विश्रांती पाडाळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष स्वप्नाली असोले, भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका हरगुडे आदीसह महिला पदाधिकारी उपस्िथत होते.
खडसे म्हणाल्या की, वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराविरोधात विरोधकांना योग्य त्या भाषेत उत्तर द्या. पक्षाने राबविलेल्या महिला सक्षमीकरण धोरणामुळेच महाराष्ट्रात महिलांना सन्मानाने वागणूक मिळत असल्याचे त्या म्हणाल्या.
२०० महिलांचा सत्कार
या वेळी महिला आघाडीच्या वतीने विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चिखली येथे भोसरी विधानसभा कार्याध्यक्ष सारिका हरगुडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन करत विविध क्षेत्रांमधील २०० महिलांना “सन्मान स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानित केले. पिंपरी सामाजिक प्रबोधनकार शारदा मुंडे यांचे “जागर सावित्रीच्या लेकींचा” हे व्याख्यान आयोजित केला. यावेळी उपमहापौर विश्रांती पाडाळे यांना प्रदेश सचिवपदी तर शोभा साठे यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.