ठाण्याच्या उपहारगृहात रोबोटीक वेट्रेस

ठाणे: आगामी काळात माणसाची अनेक कामे रोबोट्‌स (बॉट्‌स) अर्थात यंत्रमानव करतील, असे काही वर्षांपूर्वी फक्त सांगितले जायचे. मात्र आता प्रत्यक्षात ते दिवस आले असून, ठाण्यामधल्या एका उपहारगृहात चक्क रोबोट्‌स ग्राहकांना सेवा देताना दिसत आहेत.

रोबोट्‌सच्या स्त्री अवताराला ऍन्ड्रॉईड असे म्हटले जाते आणि या विशिष्ट उपहारगृहातला या ऍण्ड्रॉईडला ग्राहकांनीच ‘बेबी डॉल’ असे नाव दिल्याचे समजते. चोवीस तास चार्जिंग असलेली ही बॅटरीवर चालणारी ‘बेबी डॉल’ प्रत्येक ग्राहकाची ऑर्डरही घेते आणि त्याने दिलेल्या ऑर्डर्सनुसार खाद्यपदार्थ आणि बिलही सर्व्ह करताना दिसते. यामुळे या उपहारगृहाची जोरदार चर्चा असून येथे येणारी लहान मुले तर रोबोट्‌सच्या मागे धावताना दिसतात. अनेकदा तर ग्राहक या रोबोट्‌ससमवेत सेल्फी घेतानाही दिसतात.

बेंगळुरूमध्येही सक्षम कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर एका हॉटेल मालकाने उपाय शोधला असून, त्याने हॉटेलच्या स्वागत कक्षात दोन ऍन्ड्रॉईड बॉट्‌सची नियुक्ती केली आहे. या दोघी जणी ग्राहकांचे स्वागत करतात, त्यांचे चेहरे मेमरीमध्ये स्टोअर करतात, तोच ग्राहक परत आला तर आपोआप त्याची सर्व माहिती सिस्टीममध्ये अपडेटही करतात. दररोज किमान 1200 ग्राहकांची वर्दळ असलेल्या या हॉटेलची बहुतांश नोंदी ठेवायची कामे या ऍन्ड्रॉईड बॉट्‌सच सांभाळतात.

आसामच्या गुवाहाटी या राजधानीच्या शहरातही एका हॉटेलने वेलकम डेस्कला “पालकी’ नावाच्या ऍन्ड्रॉईड बॉट्‌ची नियुक्ती केली असून, ही “पालकी’ “नमस्कार’ करते आणि ग्राहकांना वेलकम ड्रिंकही देते. या सर्व ऍन्ड्रॉईड रोबोट्‌सची कार्यप्रणाली वाय-फायवर नियंत्रित करण्यात येत आहे. त्यामुळे कधी वाय-फाय काम करेनासे झाले, तरच सेवेत व्यत्यय येतो, अन्यथा कधीही न थकता, न सुट्टी घेता काम करणारे हे यांत्रिक कर्मचारी मानची वेटर्ससाठी एक धोक्‍याचा इशारा ठरु शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)