सासवड – पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सासवड व राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला अट्टल गुन्हेगार अदित्य भगवान कळमकर (वय 22, रा. बेलसर ता.पुरंदर जि. पुणे. मूळ गाव रा. चिखली, ता. हवेली) यास सातारा जिल्हयातील कालगाव येथून ताब्यात घेतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
या फरारी आरोपीस पकडण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व राजगड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, शरद माने, बाळासो खडके, काशिनाथ राजापुरे यांचे पथक नेमण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या पथकास तपास करीत असताना आरोपी आदित्य कळमकर हा पुणे बाजूकडून कराड येथे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे वेशांतर करून त्याचा पाठलाग करून त्याच्यावर पाळत ठेऊन आरोपीस सातारा जिल्हयातील कालगाव (ता. कराड) येथून ताब्यात घेतले आहे.
आरोपी अदित्य कळमकर हा रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी पुणे व सातारा जिल्हयात राजगड, सासवड, जेजुरी, शिरवळ या पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
या घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे व राजेश पोळ हे करीत आहेत. सदर आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.