पुणे – वीज बचतीसाठी शहरात एलईडी दिवे, पालिकेच्या इमारतींवर सौर उर्जा प्रकल्प, पालिकेच्या मिळकतींमध्ये वीज वाचवणारी यंत्रणा उभारल्यानंतरही महापालिकेचा वीज खर्च कमी झाला नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात वीज बिलांसाठीची 40 कोटींची तरतूद संपली असून आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत वीज बिलांसाठी 12 कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी वर्गीकरणाद्वारे मिळविण्यासाठी विद्युत विभागाची धावपळ सुरू आहे.
शहरातील पथदिवे, उद्याने, नाट्यगृह, पालिका इमारती, कार्यालयांसाठी महिन्याला जवळपास साडेचार कोटींची वीज वापरली जाते. पालिकेने शहरात 80 हजार एलईडी बसवले आहेत. तर नगरसेवकांच्या वॉर्डस्तरीय निधीतूनही अनेक ठिकाणी दिवे बसविण्यात आले आहेत. याशिवाय, पालिकेच्या मुख्य 26 इमारतींवर सौर उर्जा यंत्रणाही बसवण्यात आली आहे. तर अनेक कार्यालयांमध्ये वीज बचतीसाठी वेगवेगळी उपकरणे पालिकेने खरेदी केली आहे. त्यामुळे वीज बचत होणे अपेक्षित होते. त्या अनुषंगाने वीज बचतीचा अंदाज गृहीत धरून महापालिका आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांनीही 2019-20 चे अंदाजपत्रक सादर करताना या विभागासाठी केवळ 40 कोटींची रुपयांची तरतूद केली. मात्र, आता प्रत्यक्षात वीज बिलाची बचतच न झाल्याने पुढील तीन महिन्यांचे वीज बिल भरण्यासाठी तरतूदच नसल्याचे समोर आले आहे.
पथदिव्यांचा खर्च वाढला
पालिकेने खासगी कंपनीच्या माध्यमातून शहरात सुमारे 80 हजार एलईडी दिवे बसविले. त्यामुळे सुरूवातीला वीज खर्च कमी झाला. मात्र, गेल्या काही वर्षांत एकाच रस्त्यावर रस्त्यामध्ये दोन दिवे तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक खांब उभारण्यात आला असून त्यावर नव्याने दिवे बसवण्यात आले आहेत. त्यामुळे एका एलईडी दिव्याने वीज बचत झाली असली, तरी तेथे तीन नवे एलईडी दिवे नगरसेवकांच्या निधीतून बसवल्याने तो वीज खर्च वाढला आहे.