पिंपरी -महापालिका वृक्ष संवर्धन व उद्यान विभागामार्फत सन 2021 -22 या वर्षासाठी महापालिकेचे रस्ते तसेच उद्यानांमध्ये लागवडीसाठी वेगवेगळ्या प्रकारची रोपे पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी 1 कोटी 91 लाख रुपये खर्च होणार आहेत.
वृक्ष संवर्धनासाठी महापालिकेने ठिकठिकाणी वृक्ष लागवड करणे, त्यांचे संगोपन करणे, शहरात नवीन बागा व उपवने निर्माण करणे, हरितपट्टा निर्माण करणे, नागरिकांसाठी मनोरंजन स्थळांची व्यवस्था करणे, क्रीडांगणे व उपवने सुस्थितीत ठेवणे या गोष्टींवर भर दिला आहे.
शहरात पुणे-मुंबई महामार्ग, स्पाइन रोड, औंघ- रावेत बीआरटी मार्ग, काळेवाडी केएसबी चौक ते देहू-आळंदी रोड बीआरटी मार्ग असे अनेक प्रशस्त रस्ते आहेत. महापालिकेने मोठ्या रस्त्यांवरील रस्ते दुभाजक आणि वाहतूक बेटांवर 73 ठिकाणी वेल, फुलझाडे लावली आहेत. महापालिका वृक्ष संवर्धन व उद्यान विभागामार्फत महापालिकेचे रस्ते तसेच उद्यानांमध्ये लागवडीसाठी विविध रोपे पुरविण्यात येणार आहेत. या रोपांमध्ये कानोकरपस, क्रिस्टीना या रोपांसह शोभिवंत फुलझाडांमधील आरेका पाम, बोगनवेल जातींच्या रोपांचा समावेश आहे. त्यासाठी चार स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविल्या.
कानोकरपस, क्रिस्टीना आणि बोगनवेल या रोपांचा पुरवठा करण्यासाठी राबवलेल्या तीन निविदा प्रक्रियेत न्यू गार्डन गुरूज फार्म ऍण्ड नर्सरी या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा एक टक्का लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार कानोकरपस, क्रिस्टीना आणि बोगनवेल जातीची रोपे घेण्यासाठी 1 कोटी 43 लाख 55 हजार रुपये खर्च होणार आहे. तसेच आरेका पाम रोपांसाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा एक टक्का लघुत्तम दर सादर केला. त्यानुसार, आरेका पाम जातीची रोप घेण्यासाठी 48 लाख 26 हजार रुपये खर्च
होणार आहेत.